ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत सुनील बावणे यांचा विजय

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : दि. ०४ जून २०२५ रोजी शिवा बाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित आणि शहादु शिवाजी वाघ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत गझलकार सुनील बावणे (नील) यांनी द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले. ही स्पर्धा येवला येथील पांडुरंग कृपा लॉन येथे उत्साहात पार पडली. यावेळी गझलकार सुनील बावणे यांनी सादर केलेली ‘माणसे’ ही गझल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. प्रत्येक शेराला टाळ्यांचा गजर आणि “वाह…” अशा उत्कट दाद मिळत होती. संमेलनात उपस्थित साहित्यिक व रसिकांसाठी ही गझल म्हणजे एक अद्वितीय साहित्यिक मेजवानी ठरली.

या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत कवी आणि गझलकारांनी सहभाग नोंदवला होता. एकूण १५६ कविता व गझल नोंदवल्या गेल्या होत्या, त्यातून निवडक रचनांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. नामवंत, अभ्यासू आणि निष्पक्ष परीक्षकांनी परीक्षण करत स्पर्धेचे पारितोषिक विजेते निश्चित केले. कार्यक्रमाच्या समारोपात विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सुनील बावणे यांना त्यांची गझल सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सुनील बावणे हे बल्लारपूर पेपर मिलमध्ये कार्यरत असले तरी साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक साहित्यिक संमेलनांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. त्यांच्या कविता आणि गझला या नेहमीच अर्थपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्ष डॉ. माहेश्वरी गावित, डॉ. कैलास दौंड, गझलकारा मृणाल गीते, लक्ष्मणजी बाराहाते, दिग्दर्शक संदीप राक्षे, श्रीकांत बेणे, प्रशांत वाघ, बाळासाहेब गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये