अहमदाबाद मधे प्रवासी विमान कोसळले – गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते विमानात
विदेशी नागरिकांसह एकूण 242 प्रवासी होते विमानात - अहमदाबाद वरून लंडन येथे जाण्यासाठी घेतले होते उड्डाण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
गुजरात मधील मोठे व्यापारी हब तसेच गृहमंत्री अमित शाह ह्यांचा मतदारसंघ असलेल्या अहमदाबाद येथून लंडनला जाणारे प्रवासी विमान उड्डाण करताच काही मिनिटातच अपघातग्रस्त झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 12 जुन 2025 रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास घडली असुन ह्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी इतर 241 प्रवाशांसह प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच अवघ्या काही मिनिटातच हे विमान एका इमारतीला धडकल्याने अपघातग्रस्त झाले असुन विमानात मोठा स्फोट होऊन विमानाच्या ठिकऱ्या उडाल्या. अपघातग्रस्त झाल्याच्या वेळी विमान केवळ 650 फूट उंचीवर होते. विमानात काही तांत्रिक अडचणी येताच वैमानिक सुमित सबरवाल ह्यांनी ATC ला संकटाचा मेसेज दिला मात्र त्यानंतर काही क्षणातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले असुन ज्या इमारतीला आदळून विमान कोसळले त्या इमारतीतील नागरिकही भाजल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.
एअर इंडियाच्या ड्रिम लायनर AI- 171 ह्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी देखिल प्रवास करत होते ह्या अपघातात त्यांचे नेमके काय झाले ह्याबद्दल अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही मात्र अपघाताची तीव्रता बघता अपघातातील प्रवासी जिवंत राहणे हा चमत्कारच ठरेल. अपघातग्रस्त विमानात इंग्लंड, कॅनडा, पोर्तुगीज इत्यादी देशांचे नागरिकही प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.