“स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक योगदानातून बौद्ध विहार बांधकामाला बळ”

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) – मंगळवार, दिनांक 10 जून 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा, घुग्घुस अंतर्गत सुरू असलेल्या नवनिर्मित पंचशील बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी समाजबांधव मोठ्या उत्साहाने पुढे येत आहेत. या उपक्रमाला अधिक बळ देण्यासाठी नागसेन ऋषी बुरचुंडे, कृतिका नागसेन बुरचुंडे, संगीता चंद्रसेन बुरचुंडे, विकास चंद्रसेन बुरचुंडे आणि धनश्री चंद्रसेन बुरचुंडे यांनी आपल्या दिवंगत मातोश्री स्मृतीषेष विमलबाई ऋषी बुरचुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंचवीस हजार रुपयांचे (₹25,000) आर्थिक योगदान दिले.
या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे घुग्घुस नगर शाखेचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे आणि कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे यांनी समाजात एक प्रेरणादायी संकल्पना मांडली. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा तिसरा दिवस साजरा करण्याऐवजी त्या पैशातून समाजोपयोगी कार्यात, विशेषतः विहाराच्या बांधकामासाठी, दान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ही संकल्पना समाजात सकारात्मक प्रतिसाद मिळवत असून अनेक बौद्ध बांधव सण-समारंभ साधेपणाने साजरे करून त्या निधीचा उपयोग विहार बांधकामासाठी करत आहेत. लोकवर्गणीतून होणारे हे कार्य बौद्ध समाजाच्या संघटनासाठी व विकासासाठी महत्वाचे ठरत आहे.
कार्यक्रम प्रसंगी चंदगुप्त घागरगुंडे, यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा व केंद्रीय शिक्षिका माया सांड्रावार, सल्लागार संभाजी पाटील, सोहम पाटील, जितेंद्र साठे यांच्यासह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पडले असून बुरचुंडे परिवाराचे व अन्य दानदात्यांचे समाजात विशेष कौतुक होत आहे.