ताज्या घडामोडी

कार उभी घराच्या दारावर पण पैसे कटतात टोल नाक्यावर – चंद्रपुरातील कारचा मालेगाव टोल नाक्यावर कापला टोल

फास्ट टॅग चा असाही गैरवापर - चंद्रपुरातील पत्रकाराची वाहन चोरीच्या भीतीने मध्यरात्री उडविली झोप

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महामार्गावर प्रवास करताना टोल भरावा लागतो हे सर्वांनाच माहिती आहे मात्र ह्या टोल भरण्याच्या आधुनिक प्रक्रियेमुळे वाहन मालकांची आर्थिक फसवणूक होण्याची घटना चंद्रपूर येथील प्रसिद्ध व्यापारी व पत्रकार जितेंद्र चोरडिया ह्यांना अनुभवायला मिळाली असुन ह्या प्रकारामुळे कुटुंबीयांसह त्यांची झोप उडाली होती.

महाराष्ट्रात वाहन चालकांकडून रस्ते बांधणीचा खर्च वसुल करण्याची पद्धत देशभर सुरू झाली. ही वसुली करण्यासाठी महामार्गावर विशिष्ट अंतरावर टोल नाके सुरू करण्यात आले. जुन्या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या. वाहनांना टोल नाक्यावर बराच वेळ थांबावे लागायचे त्याचप्रमाणे टोल वसुलीमधे पारदर्शकता नसल्याने शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे धोरण स्विकारून अत्याधुनिक अशी फास्ट टॅग पद्धती स्वीकारली. ह्या पद्धतीमुळे टोल नाक्यावर होणारी गर्दी टळली असली तरी आधुनिक मार्गाने लुबडण्याचे नवे तंत्रज्ञान लबाड लोकांच्या हाती लागल्याचे दिसुन येत आहे.

चंद्रपूर येथील प्रसिध्द व्यापारी तसेच दै. लोकशाही वार्ता चे जिल्हा प्रतिनिधी व चांदा ब्लास्ट न्युज पोर्टलचे संपादक जितेंद्र चोरडिया ह्यांनी नेहमीप्रमाणे आपली इनोव्हा कार क्र. MH34 AM 4410 आपल्या घराशेजारी उभी केली. दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9:16 मिनिटांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश आला. त्यावेळी तो संदेश दुर्लक्षिला गेला. नेहमीप्रमाणे ते व त्यांचे कुटुंबीय झोपी गेले मात्र जितेंद्र चोरडिया ह्यांना मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास जाग आल्याने त्यांनी सहज मोबाईल बघितला असता त्यांना तो मेसेज दिसला ज्याने त्यांची व कुटुंबीयांची झोप उडविली.

त्यांना प्राप्त झालेला मेसेज चक्क टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाचा टोल कपल्याचा होता. महत्वाचे म्हणजे त्या दिवशी त्यांची कार दिवसभर एकाच जागी उभी होती मात्र आलेल्या मॅसेज नुसार त्यांच्या कारचा मालेगाव येथील टोल नाका पार केल्यामुळे तब्बल 625 रुपयांचा टोल टॅक्स कापल्या गेल्याचे दाखवत होता. आपल्या घराशेजारी उभी असलेली कार मालेगाव जवळ असल्याचे लक्षात येताच त्यांची झोप उडाली कारण घरातील कुणीही बाहेरगावी गेले नव्हते ह्याचाच अर्थ कार चोरी गेली असुन मेसेज आला त्यावेळी ती कार मालेगाव शहरानजीक होती. अखेरीस त्यांनी बाहेर निघुन कार नेहमीच्या ठिकाणी आहे अथवा नाही ह्याची खातरजमा केली असता कार जागेवरच असल्याचे आढळुन आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कार जरी सुरक्षित असली तरीही मालेगाव टोल नाक्यावर आपल्या कारचा टॅक्स कसा कापला गेला असा प्रश्न त्यांना पडला असुन त्यांच्या कारला लावलेला फास्ट टॅग कारच्या समोरील काचावर तसाच व्यवस्थित असल्याचे दिसत होते मात्र टोल टॅक्स मालेगाव नाक्यावर कापला गेला होता हे कसे घडले हे अनाकलनीय आहे. यासंदर्भात विचार केला असता असे लक्षात येते की एकतर ह्यापूर्वी टोल नाक्यावरुन कार गेली असता त्यावेळी फास्ट टॅगची माहिती हॅक करून बनावट फास्ट टॅग तयार करण्यात आले असुन त्याद्वारे वाहन धारकांची फसवणूक करण्यात येत असावी व ह्याकामी टोल कर्मचारी सहभागी असावेत किंवा फास्ट टॅग कंपनी बोगस फास्ट टॅग तयार करून ग्राहकांची लुट करत असावी. यासंदर्भात वाहन मालक व पत्रकार जितेंद्र चोरडिया संबंधित विभागाला तक्रार करणार असुन मालेगाव टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासल्यास गुन्हेगाराचा शोध लागू शकतो व हा गुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात आला की दुसऱ्या वाहनाला सदर कारच्या नंबरची बोगस नंबर प्लेट लाऊन करण्यात आला ह्याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये