ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम प्रभावशाली करणर – वनमंत्री नाईक

वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

 गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत, ही अतिशय दु:खद घटना असून शासनस्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

वन अकादमी येथे वनक्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद ‘वनशक्ती – २०२५’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, तेलंगणाच्या वनबल प्रमुख श्रीमती सुवर्णा, भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचनदेवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, असे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपनाचा लाभ देण्यात येईल. वनविभाग हा एक महत्त्वाचा विभाग असून जंगलात मजबूत गाड्यांची आवश्यकता आहे. अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वनपाल, वनरक्षक, आरएफओ यांच्या स्तरावरील कर्मचा-यांना स्वरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील. वनविभाग हा एक परिवार आहे. या परिवारांमध्ये सर्वांची काळजी घेण्याची वनमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात वनविभाग अग्रेसर राहील. तसेच पुढील वन विभागाच्या भरतीमध्ये ५० टक्के भरती महिलांची करण्यात येईल. सध्या जिल्हास्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वनविभागात राबविण्यात येणार आहे. वन विभागाने तीन-चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे. चंद्रपूरच्या योगदानातून वनांचे चांगले संरक्षण होत आहे. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेश गेट अतिशय चांगले करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास मिळेल : वनविभागात कार्यरत असलेल्या महिलांची राष्ट्रीय परिषद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यासाठी सुमिता विश्वास यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या प्रमुख तीन पदांवर महिला विराजमान आहेत. यात राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख यांचा समावेश असून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव आहेत. चंद्रपूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल.

वनांवर आधारीत उद्योग यावेत : आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्ह्यात महिलांची राष्ट्रीय परिषद होत आहे, ही अभिमानची गोष्ट आहे. या दोन दिवसात कार्यशाळेत चांगले मंथन होईल. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो ते काम उत्कृष्टच असते. वनांचे संवर्धन व्हायला पाहिजे, मात्र मानव वन्यजीव संघर्ष हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन अशी नियुक्ती करावी. वनांवर आधारित उद्योग जिल्ह्यात यावे. त्यातून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

महिला हे शक्तीचे रूप : आमदार देवराव भोंगळे

महिलांच्या या कार्यशाळेला वनशक्ती असे नाव देण्यात आले आहे. ख-या अर्थाने महिला म्हणजे शक्तीचे रुप आहे, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. आज प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पर्यावरणाला पुढे नेण्यासाठी महिलांनी काय करावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव हा प्रश्न अतिशय गंभीर असून पर्यावरणाचा ऱ्हास ही सुद्धा समस्या आहे. तसेच वन्यजीवांकडून शेतमालाचे होणारे नुकसान याबाबत वनविभागाने चांगल्या उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.

महिलांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा : आमदार करण देवतळे

आपल्या विधानसभा क्षेत्रात येणारे खुटवंडा सफारी गेट अतिशय प्राचीन आहे. त्याचे सुशोभीकरण करून येथे सफारींची संख्या वाढविण्यात यावी. वनविभागात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहे. महिलांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार करण देवतळे यांनी केले.

अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती झाली आहे. वनविभागात काम करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण विस्तीर्ण भूप्रदेश, वन्यजीव यांचा मोठा धोका असतो. वनविभागाची नोकरी ही दुर्मिळ क्षेत्रातील नोकरी आहे. महिलांना एक संधी देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागतपर भाषण वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी केले. तर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुवर्णा आणि कांचन देवी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया खाडीलकर यांनी तर आभार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये