सावरगाव माळ येथे भव्य संत संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वेदांत तत्वज्ञानाच्या माध्यमातून समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, सुसंस्कृत, सुजाण समाज घडविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे ह. भ. प. गुरुवर्य डॉ. अनिरुद्धजी महाराज यांच्या एकसष्ठी सोहळ्याचे औचित्य साधून भव्य संत संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. वारकरी शिक्षण प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र मुक्तधाम आश्रम सावरगाव माळ या ठिकाणी समस्त भक्तगणांच्या वतीने विविध कार्यक्रम या निमित्ताने संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ.प.परमपूज्य डॉ. यशोधन महाराज साखरे (साधकाश्रम आळंदी देवाची) हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ. प. श्री प्रकाश महाराज जवंजाळ (सदस्य वी.रू.म. समिती पंढरपूर) यांच्या हस्ते झाले. संत संमेलनाला श्री श्री 1008 श्रीकृष्ण चैतन्य स्वामी (निळकंठेश्वर संस्थान मंठा) ह. भ.प.पंढरीनाथ नाना तावरे (संत वाङ्मय सेवा संघ वाकुळनी) ह. भ. प. सानप गुरुजी वैष्णवगड ह. भ. प. मोहननाथ महाराज पैठणकर ह.भ. प. रंगनाथ महाराज पितळे ह. भ. प.देवदत्त महाराज पितळे ह. भ. प. भगीरथ बाबा (पांडुरंग आश्रम खेरडा) ह.भ.प. बा. भो. महाराज शास्त्री (लाडगाव) ह .भ. प. सोनुणे गुरुजी ह. भ. प. नाना महाराज ह. भ. प. बळीराम बाबा मघाडे ह. भ. प. वाघ गुरुजी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर संत महंत मंडळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे, शिक्षक आमदार विक्रमजी काळे, आ.मनोज कायंदे, माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर, माजी आमदार तोतारामजी कायंदे, कृषी रत्न विजय अण्णा बोराडे, भास्कर आबा दानवे, संजूभाऊ खोतकर, ऋषी भैय्या जाधव, यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या संत संमेलनाच्या निमित्ताने वृक्षारोपण, ग्रंथ तुला, सोहमयोगी या ग्रंथाचे विमोचन, बालसंस्कार शिबिराची सांगता असे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहात लोक पावत चाललेली ज्ञानेश्वरी प्रवचन परंपरा व हरी पाठाचे बदलत चाललेले स्वरूप आणि त्याचप्रमाणे संप्रदाय शुद्ध कीर्तन परंपरेला आलेले दांभिक स्वरूप या विषयावरती आपल्या कीर्तनातून परमपूज्य डॉ. यशोधन महाराज साखरे यांनी प्रकाश टाकला तर सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडवायचा असेल तर शाळेसोबतच अशा वारकरी शिक्षणाची सुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे असे माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी आपल्या भाषणातून प्रतिपादित केले. तर श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, पंढरीनाथ नाना तावरे महाराज, बा.भो. शास्त्री महाराज, सोनुने गुरुजी, नाना महाराज पोखरीकर, ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ यांनी या संत संमेलनामध्ये वेदांत तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाचे समाजातील महत्त्व याविषयी आपले मत व्यक्त केले. खा. कल्याण काळे आ .विक्रम काळे आ. मनोज कायंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य उद्धवराव मस्के यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ह. भ. प. नामदेव महाराज मुरकुट यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.