राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
६० विद्यार्थ्यांनी घेतला मार्गदर्शनाचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साओली येथे १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन कक्ष व आंतरमहाविद्यालयीन गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते. त्यांनी विद्यार्थ्यांना १२ वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा.संगानंद बागडे करिअर मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक, यांच्या प्रास्ताविकेने झाली.
विषयानुसार तज्ज्ञ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. देवीलाल वताखेरे यांनी “१२ वी नंतर विज्ञान शाखेत विविध करिअर संधी” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत नव्या व पारंपरिक क्षेत्रांची माहिती दिली. प्रा. विजयसिंग पवार यांनी वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. डॉ. राम वासेकर यांनी कला शाखेतील करिअर पर्यायांवर सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना आपले छंद व आवड ओळखून योग्य क्षेत्र निवडण्याचे आवाहन केले. तसेच प्रा. संदीप देशमुख, IQAC समन्वयक, यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा, अधोरेखित यश, पायाभूत सुविधा आणि महाविद्यालयात उपलब्ध असणारे अभ्यासक्रम बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन वाकडे यांनी केले.
या कार्यक्रमात सावली व आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधत आपले शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्य घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.
हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे या हेतूने आयोजित करण्यात आला होता व तो उपस्थितांनी अत्यंत प्रेरणादायी व उपयुक्त असल्याचे सांगितले. प्रा. मोडक प्रा.निखाडे,प्रा.किरण बोरकर, प्रा. वैराळे प्रा. मार्कंडेवार मॅडम आणि प्रा.पाटील यांचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य लाभले.