नगर प्रशासनाचे दुर्लक्षपणामुळे सावली शहरात अनधिकृत बांधकाम वाढले
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाबाळ संगीडवार यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी डॉ. शेखर प्यारमवार
सावली : बांधकाम करण्याची परवानगी न घेता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे दुमजली इमारतीचे बांधकाम केल्या जात आहे. असे असतांना नगर प्रशासन मात्र मुग गिळून बघ्याची भूमीका घेत आहे. असा आरोप ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते राजाबाळ पा. संगीडवार यांनी केला असून या भोंगळ कारभाराविरूध्द वरीष्ठांकडे दाद मागु अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावु असा इशाराही संगीडवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
स्थानिक वार्ड नं. 9 येथील मध्यवर्ती ठिकाणी मागील काही महिण्यांपासून सिमेंटच्या पक्या दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे बांधकाम होत असल्याने बांधकाम करणा-यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे बांधकाम शुल्काचा भरणा करून नियमानुसार बांधकाम करण्याची परवानगी प्राप्त केली असावी. असा अंदाज होता. परंतू सदरचा अंदाज पुर्ण खोटा ठरला. होत असलेल्या बांधकामा संबंधी आवश्यक असलेली माहितीची मागणी माहिती अधिकार कायदयान्वये नगर पंचायत कडे केली. तेव्हा सदर बांधकाम करणा-यांने बांधकाम करण्यापूर्वी नगर पंचायतकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली.
ग्राम पंचायत असो किंवा नगर पंचायत, नगर परिषद असो किंवा महानगर परिषद क्षेत्रात बांधकाम करतांना नियमानुसार बांधकामासंबंधीचे आवश्यक दस्तऐवज आणि बांधकाम करण्यासाठीचे आवश्यक शुल्क भरणे नियमानुसार बंधनकारक आहे. परंतू सावली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या दुमजली बांधकामाच्या परवानगी संबंधी बांधकामकर्त्यांनी साधा अर्जही दिलेला नाही. अशी माहिती नगर पंचायतच्या बांधकाम विभागाचे जन माहिती अधिकारी यांनी दिली आहे.
नियमानुसार नगर पंचायत क्षेत्रात बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतू बांधकामकर्त्यानी नगर प्रशासनाची परवानगी न घेता राजरोसपणे बांधकाम केल्या जात आहे.हा प्रकार सावली शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे. तरीसुध्दा नगर प्रशासन मात्र बघ्याची भूमीका घेत आहे.
नगर प्रशासनाच्या या दुर्लक्षामूळे नगर पंचायतीचे आर्थिक नुकसान होत असून अवैद्य बांधकामाचा पायंडा याच नगरपंचायत ने लादून दिल्या सारखा प्रकार होत असून सावली शहरात होत असलेले अनधिकृत बांधकाम हे नगरपंचायत चे पदाधिकारी, नगरसेवक,व अधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाबाळ पा. संगीडवार यांनी दिला आहे.