ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप देवगडे यांचे उपसरपंचपद रद्द

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले प्रदीप देवगडे यांचे उपसरपंचपद रद्द करण्यात आले आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक १५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयात ही कारवाई करण्यात आली असून, शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा ठपका देवगडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ग्रामपंचायत घोडपेठचे सदस्य देवानंद शंखावार यांनी उपसरपंच देवगडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी या प्रकरणात अधिवक्ता राहुल खडके यांच्यामार्फत अर्ज सादर केला होता. अर्जदाराने मांडलेल्या मुद्द्यांवर आणि पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पष्ट निर्णय देत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४(१)(ज-३) अंतर्गत श्री. प्रदीप देवगडे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे ठरवले.

घोडपेठ येथील सर्वे क्र. ३७२ मधील भुखंड क्र. १०० हा तलाठी साजा क्र. ३२ घोडपेठ करिता राखीव ठेवण्यात आलेला होता सदर भूखंड हा शासकीय मालमत्ता आहे. भुखंड क्रमांक १०० मधील ५०० चौरस फुट जागेवर उपसरपंच प्रदिप देवगडे यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले आहे. त्यामुळे तलाठी घोडपेठ यांनी पोलीस पाटील व ईतर पंचांसमक्ष २९.०३.२०२३ रोजी या अतिक्रमाणाबाबत मोका पंचनामा केला. प्रकरणातील संलग्न भुखंड नोंदवहीच्या झेरॉक्स प्रतीचे निरीक्षण केले असता तलाठी कार्यालयास भूखंड क्र १०० आवंटित झालेला असताना सदर भूखंडाच्या आराजी मध्ये खोडतोड करून उपसरपंच प्रदीप देवगडे यांचे नावे त्यातील काही आराजी नमूद करून त्यास १००/१ असा क्रमांक देण्यात आलेला आहे. तसेच याच प्रकारची खोडतोड नकाशा मध्ये आढळून येत आहे. या बाबीची पृष्टी तहसीलदार भद्रावती यांनी त्यांचे अहवालात केलेली आहे. या बाबी सदर प्रकरणाचा निकाल देतांना निदर्शनास आल्या आहेत.

दि. १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या प्रकरणात आदेश दिला आहे. उपसरपंच प्रदिप देवगडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रदिप देवगडे यांचे ग्रामपंचायत उपसरपंच पद रद्द ठरविण्यात येत आहे. तहसिलदार भद्रावती यांच्या दिनांक २३ मे २०२३ च्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधितांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. सदर आदेशाविरुद्ध अपर आयुक्त नागपूर यांचेकडे अपील करता येईल हा आदेश अपील कालावधी संपल्यानंतर लागू होईल. असे निकालपत्रात नमुद करण्यात आलेले आहे.

ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधींनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तेच बेकायदेशीर कृत्य करत असतील, तर अशा व्यक्तींना पदावर राहण्याचा अधिकार नाही.

– देवानंद शंखावार

अर्जदार तथा सदस्य, ग्रामपंचायत घोडपेठ

सदर आदेशाविरूध्द मी अपर आयुक्त नागपूर यांच्याकडे अपील दाखल करणार आहे.

प्रदिप देवगडे

– उपसरपंच ग्रामपंचायत घोडपेठ

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये