पोलिसाची गळा आवळून केली हत्या; कारमध्ये आढळला मृतदेह!
बडतर्फ पोलिसांसह 4 आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जालना जिल्हा पोलिस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना ३० मार्च रोजी समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तालुक्यात पोलिसाच्या हत्येची सात दिवसांत दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी रात्री उशिरा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बडतर्फ पोलिसांचा समावेश आहे .
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडवानिमित्त मृतक ज्ञानेश्वर म्हस्के हे शनिवारी त्यांच्या मूळ गावी आले होते. काही कामानिमित्त ते गिरोलीहून देऊळगाव राजा येथे गेले; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने वारंवार फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता, सिंदखेडराजा रोडवरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वन विभागाच्या हद्दीत त्यांची कार (क्रमांक एमएच २० डीवाय ३०६३) उभी असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळाली
घटनास्थळी एसडीपीओ मनीषा कदम व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नरवाडे, भरत चिरडे, पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल, कोमल शिंदे आणि पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, कारमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. कारचे दरवाजे आतून बंद होते आणि ड्रायव्हिंग सीटवर म्हस्के यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा दिसून आल्या होत्या. त्यावरुन प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला.
चार संशयितांना घेतले ताब्यात….
पोलिसांनी रात्री उशीरा चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपी निष्पण झाल्यानंतर हत्येचे कारण समोर येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांना केले पाचारण….
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
सात दिवसांत पोलिसाच्या हत्येची दुसरी घटना….
यापूर्वीही अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची २३ मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सात दिवसांतच आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पोलिसच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.
पोलिसांनी 4 तासात 4 आरोपींना अटक केली आहे, आरोपी मध्ये बाबासाहेब श्यामराव मस्के, वय 38 रा गिरोली, कमलाकर पंडितराव वाघ, वय 44, बडतर्फ पोलीस अंमलदार, दिलीप बाजीराव वाघ वय 52 , बबन संपत शिंदे,वय 38 रा बंजार उम्रद जिल्हा जालना यांचा समावेश आहे.
दिलिप वाघ हा छत्रपती संभाजी नगर येथे पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होता, मात्र एका गुन्ह्यातील सहभागामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते.
21मार्च रोजी सायंकाळी साडे सात वाजता च्या सुमारास गीरोली खुर्द येथील पोलिस ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के यांचा कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आला, याप्रकरणी विष्णू मस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासात स्थानीक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलिस यांनी चारही आरोपींना अटक केली, देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना. 5 एप्रिल पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम करित आहे.