महिला बचत गटांनी केली ७ लक्ष ४८ हजार रुपयांच्या वस्तुंची प्रत्यक्ष विक्री
प्रदर्शनीस उत्स्फुर्त प्रतिसाद ; मिळाल्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर

चांदा ब्लास्ट
शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच बचत गटांना दिवाळी निमित्त पदार्थांचे ऑर्डर सुद्धा मिळाले आहेत.
मनपाद्वारे आयोजीत या महोत्सवात बचतगटांसाठी निःशुल्क सहभाग होता. बचतगटाद्वारे हातांनी बनविलेले पदार्थ जसे चकली, शेव,अनरसे,बालुशाही, चिवडा या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आली. घरी नेण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या वस्तुंचे ऑर्डर सुद्धा दिले. महिलांनी तयार केले विविध प्रकारचे लोणचे, शोभेच्या वस्तु, कापडी पिशवी,दिवे, रांगोळी, मातीचे भांडे या सर्वांची लाखोंच्या घरात विक्री होऊन दिवाळीनिमित्त बचतगटांच्या आर्थीक बचतीस हातभार लागल्याचे समाधान तसेच असे विक्री व प्रदर्शन दर वर्षी लावण्याचा मानस आयुक्त विपीन पालीवाल यांनी व्यक्त केला.
सदर प्रदर्शनीत महिला बचत गटांद्वारे ३५ स्टॉल्स लावण्यात आले होते. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट दिल्याने यात ७, लाख ४८ हजार किमतीच्या वस्तुंची प्रत्यक्ष विक्री करण्यात आली तर १ लाख ८८ हजार रुपयांचे ऑर्डर बचत गटांना मिळाले असे एकुण ९ लाख ३६ हजार रुपयांची उलाढाल या ५ दिवसात झाली. या प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना प्रमुख रफिक शेख, रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे,सुषमा करमनकर,रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन तसेच वॉर्ड सखी यांनी अथक परीश्रम घेतले.



