गोंडपिपरी तालुक्यात चोर बी. टी. बियाणे जप्त
दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल ताब्यात ; भरारी पथकाची यशस्वी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यात सध्या कापूस बियाणे खरेदीची लगबग सुरू असून, प्रत्येक शेतकरी कापूस बियाणे खरेदीच्या प्रयत्नात आहे. अशातच, चोर बी टी बियाणे विक्रेत्यांनी तालुक्यात आपले जाळे पसरविले असून, १२ मे रोजी वढोली_विठ्ठलवाडा मार्गावर चोर बी टी बियाण्याची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना दुचाकीसह पकडण्यात तालुका भरारी पथकाला यश आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैधरित्या बंदिस्त कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मोजा वढोली ते विठ्ठलवाडा या मार्गावर दोन इसम दुचाकी होंडा शाईन वाहनाने शासनाने प्रतिबंधित केलेली HTBT (चोर बी.टी.) कापूस बियाणे जवळ बाळगून वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती तालुका भरारी पथकाला मिळाली. या माहितीवरून, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, जी . बी. पाटील, दोन पंच व पोलीस विभाग यांचे सह घटनेची शहानिशा करण्यासाठी वढोली ते विठ्ठलवाडा रोडवर नाकाबंदी केली असता एक संशयित दुचाकी वाहन येताना दिसून आले.
सदर दुचाकीस्वारास हात दाखवून थांबवले असता, त्या दुचाकीवर राजेंद्र खुशाबराव ठेंगणे (४० वर्ष ) राह. नांदगाव, प्रकाश यादव ताजने (५१ वर्ष) राह. राजुरा हे मिळून आले. त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिक बोरीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये प्रतिबंधित प्रत्येकी ४५० ग्रॅम वजनाचे ६० पॅकेट HTBT (चोर बी. टी.) कापूस बियाणे आढळून आले. ज्या बियाणे पॅकेटची प्रत्येकी किंमत १०००/- रुपये असा एकूण ६०,०००/- रुपये किमतीचे बियाणे व होंडा शाईन कंपनीची दुचाकी क्रमांक एम. एच.३४सी. इ.११९५, किंमत अंदाजे ५०,०००/- असा एकुण १,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, जी.बी. पाटील, पोअ. वंदीराम पाल, पोह. तिरुपती गोडसेलवर, प्रवीण कडुकर यांनी केली आहे.



