जीवनदायीनी इरई नदीच्या संवर्धन व संरक्षणाची समस्या विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सादर
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला दुसरा विनंती अर्ज

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर विधानसभा विनंती अर्ज समितीकडे विनंती अर्ज सादर केल्यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरची जीवनदायीनी असलेल्या इरई नदीच्या संवर्धन व संरक्षणासाठी विधानसभा विनंती अर्ज समितीकडे नागरिकांचा अर्ज आज सादर केला.
ईरई नदीच्या पात्रात मोठया प्रमाणावर गाळ साचल्याने नदीपात्र उथळ झाले आहे, यात मोठया प्रमाणावर काटेरी झुडपांची वाढ झाली आहे. यामुळे प्रत्येक वर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते व मोठया प्रमाणावर वित्तहानी देखील होते. रात्री अपरात्री पूरपरिस्थिती निर्माण होऊन शहरालगतच्या वस्त्यामध्ये पाणी शिरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या समस्येवर अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारा नागरिकांचा विनंती अर्ज आज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात सादर केला. विधानसभा अध्यक्षानी हा अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
विधानसभेत अस्तित्वात असलेल्या विविध संसदीय आयुधांचा वापर करूनही एखादी समस्या दीर्घकाळ प्रलंबित असते. त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी विधानसभा विनंती अर्ज हे संसदीय आयुध सदस्यांना वापरता येते. उत्कृष्ट संसद पटू म्हणून विख्यात असलेल्या आ सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील प्रदूषणा पाठोपाठ इरई नदीच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न विधानसभा विनंती अर्ज समितीच्या पुढ्यात सादर करून उपाययोजनेचा मार्ग सुकर व सुलभ केला आहे.