क्षयरोग दुरीकरण मोहीमेअंतर्गत मनपाने घेतली 634 आरोग्य शिबीरे
1 लक्ष 23 हजार 258 नागरिकांची तपासणी ; 60 नागरिक क्षयरोगग्रस्त

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरात ७ डिसेंबर 2024 पासून 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसांच्या कालावधीत “100 दिवस मोहीम” राबवण्यात येत आहे.केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या धोरणानुसार सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे ध्येय आहे.त्यानुसार चंद्रपूर मनपा आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत 634 आरोग्य शिबीरे आयोजीत करून 1 लक्ष 23 हजार 258 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांमधील 9820 नागरिकांची क्ष-किरण चाचणी तर 3749 नागरिकांचे थुंकीचे नमुने तपासण्यात आले ज्यातील 60 नागरिक हे क्षयरोगग्रस्त आढळुन आल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहे. क्षयरोग दुरीकरण मोहिमेत अति जोखमीच्या असलेल्या झोपडपट्टी, वीटभट्टी कामगार वस्ती, विडी कामगार, भटक्या व स्थलांतरित तसेच खाण कामगार,बेघर, तुरुंग,वृद्धाश्रम,आश्रमशाळा या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येऊन जास्त क्षयरोग असलेल्या भागांचे मॅपिंग करण्यात येऊन अति जोखमीची लोकसंख्या जसे 60 वर्षावरील व्यक्ती, मागील पाच वर्षांतील टीबी बाधित रुग्ण, टीबी संपर्कातील व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही, एच. आय. व्ही. बाधित तसेच इतर जोखीम गट यांची तपासणी करण्यात येत आहे.
क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढविणे, क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते. त्यादृष्टीने, नागरी सहभागातून व क्षयरोग विभाग,चंद्रपूर यांच्या सहकार्याने मनपा क्षेत्रात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पुढील 10 लक्षणांपैकी (दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, रात्री घाम येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, वजन कमी होणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, नुकतेच शारीरिक बदल, बेडक्यामध्ये रक्त येणे, जुना आजार) कोणतेही लक्षण आढळल्यास जवळच्या मनपा आरोग्य केंद्रात उपलब्ध सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे तसेच नागरिकांनी घरी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
सदर शिबिरे यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात डॉ.अश्विनी भारत, डॉ. जयश्री वाडे, डॉ.विजया खेरा,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.अरवा लाहिरी,डॉ. शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ.घोषणा कोराम यांनी सहकार्य केले.