खाजगी मीडिया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याच्या निर्णयाला विरोध
लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र सरकारने वृत्त वाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमातून बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे.
पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खाजगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉर्शिप लागली जाण्याचा धोका आहे. हा निर्णय सरकार विरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
देशाच्या लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करतो आहोत सरकारने पारदर्शकता न ठेवता खाजगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास येत्या 12 मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन व निदर्शने करणार आहोत ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असे आम्हाला वाटते.
यासाठी आमच्या मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वर्धा वर्धा जिल्हा पत्रकार संघाने निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन दिले आहे.