ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर “त्या” दारू दुकानाला ३० जूनपर्यंत टाळे

दहा तासांच्या आंदोलनाला मोठे यश ; सव्वीस आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तब्बल १० तासांच्या रस्ता रोको आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेले आंदोलन शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुरू होते.आंदोलनामुळे गोंडपिपरी–मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे ५०० महिला, पुरुष व बालकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने प्रशासनालाही तातडीने दखल घ्यावी लागली.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनंतर उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम १४२(२) अंतर्गत वढोली येथील एस. के. बार अँड रेस्टॉरंट २० जून ते ३० जून २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.

गेल्या सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदी असलेल्या वढोली गावात ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतरही दारू दुकान सुरू करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.

मात्र, ग्रामस्थांनी हा केवळ पहिला टप्पा असल्याचे स्पष्ट केले असून ३० जूननंतरही दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी कायम राहणार आहे. ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करून गावातील दारूबंदी कायम ठेवावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

*सव्वीस आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल*

वढोली ग्रामपंचायचे प्रशासक सरपंच राजेश कवठे, सुरज माडूरवार यांच्यासह २६ आंदोलनकर्त्यांवर काल झालेल्या चक्का जाम आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीअंती आणखी काही जणांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल कारवाईमुळे आंदोलनकर्त्यांच्या निर्धारात कोणतीही तडजोड झालेली नसून, “कितीही गुन्हे दाखल झाले तरी वढोली गावात दारूचे दुकान सुरू होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्त समाजाच्या ध्येयासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

*आंदोलनस्थळी भोजनाची व्यवस्था*

आंदोलनामुळे रस्त्यावर ट्रकचालक व इतर वाहनचालकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यांच्या गैरसोयीची जाणीव ठेवत गावकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसह अडकलेल्या वाहनचालकांसाठीही भोजनाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी व माणुसकीची परंपरा जपली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये