वनहक्क प्राप्त वन जमिनीचे सिमांकना करीता शिवार फेरीचे आयोजन
टाटा सामाजिक संस्थेच्या मदतीने विहीरगांव ग्रामसभा करणार सामूहिक वनहक्क व्यवस्थापन विकास आराखडा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील मौजा विहीरगांव ग्रामसभेच्याच्या वतीने सामुहिक वनहक्क प्राप्त वन क्षेत्रांची संयुक्त शिवार फेरी घेण्यात आली.
अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम,२००६,नियम २००८ व सुधारित नियम,२०१२ नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना कलम३(१) नुसार सामुहीक वन हक्कात प्राप्त झालेल्या सावली वनपरिक्षेत्रातील गेवरा बुज बिटातील मौजा विहीरगांव येथील सर्व्हे क्रमांक १९८/१ चे क्षेत्र ७५.९२.व १७१ चे क्षेत्र २३.४१ हे.आर, एकुन ९९.३३ हेक्टर सामूहिक वनहक्क क्षेत्र ग्रामसभेला सन २०१९ मध्ये प्राप्त झाला होता.
सदर वन जमिनीमध्ये अनु.जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना स्वतः घ्या उपजिविकेसाठी धारण करणे व राहण्याचा हक्क ,निस्तार हक्क, सिमाअंतर्गत पारंपारिक गोळा केलेले गौण वन उत्पादनाचा वापर व विल्हेवाट लावणे यातील सामित्व हक्क प्राप्त करणे,पाण्यातील मत्स्य व्यवसाय,चराई,पारंपारिक मोसमी साधन संपत्ती मिळविणे,निरंतर वापर करण्यासाठी व्यवस्थापन व संवर्धन करण्यात आलेल्या सामाजिक वन स्रोतांचे संरक्षण पुनर्निर्माण,संवर्धन व्यवस्थापन करण्याचे हक्क प्राप्त झाले असुन यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी प्राप्त सामुहीक वन हक्क क्षेत्रांचे सिमांकना करुन, व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी,ग्रामसभेच्या वतीने टाटा सामाजिक संशोधन संस्था मुंबई, महसुल विभाग,वन विभाग, ग्रामपंचायत, ग्रामसभा वनहक्क व्यवस्थापन समिती,यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फरवरी २०२४ रोज बुधवारी घेण्यात आली. यावेळी टाटा सामाजिक संशोधन संस्थान,मुंबई चे समन्वयक नितीन ठाकरे, प्रवेश सुटे, वनविभागाचे प्रतिनिधी बिट वनरक्षक श्रीराम आदे,तलाठी खंदारे,ग्रामसेवक उमेश रामटेके,सरपंच हेमंत ढोक, सामुहीक वन हक्क व्यवस्थापन समिती चे सचिव दिलीप फुलबांधे, सीएफआरसी समितीचे सदस्य कुसमाकर वाकडे,प्रेमदास काळबांधे,नितीन वाकडे, अंबादास वाकडे,वनीता कोटांगले,कांता धारणे, रुख्मा घरत, रोजगार सेवक संजय भोयर,रोजगार सहाय्यक उमेश वाकडे, वन कामगार विनोद वाघरे व ग्रामसभा सदस्य उपस्थित होते.