ताज्या घडामोडी

चर्मकार समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील – ना. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

बल्लारपूर येथे संत रविदास यांच्या नावाने सभागृह उभारणार

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर : बल्लारपूर शहरात चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात आहे. चर्मकार बांधवांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. 1994 मध्ये बाबूपेठ (जि.चंद्रपूर) येथे चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाची निर्मिती केली. या मतदारसंघात विभिन्न जाती, धर्मासाठी सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. संत रविदास समाजसेवा संस्थेच्या मागणीनुसार, बल्लारपूर शहरात देखील संत रविदास महाराजांच्या नावाने सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, असा शब्द राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

बल्लारपूर येथे चर्मकार समाज स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘बल्लारपुरातील चर्मकार समाज बांधवाकरिता स्वतःचे सभागृह नाही. जमिनीची उपलब्धता करून संत रविदास महाराज यांच्या नावाने उत्तम सभागृह उभारण्यात येईल. कष्टकरी बांधव म्हणून ओळख असलेल्या चर्मकार समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. महायुती लाडक्या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सरकार आहे.’

‘2014 पर्यंत देशातील साडेसहा कोटी लोकांना मातीच्या व कुडाच्या घरात राहावे लागायचे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साडेचार कोटी बांधवांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले. मी राज्याचा मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये अनेक योजना निर्माण करण्याचे कार्य केले. चर्मकार समाजाच्या तरुण-तरुणांसाठी काही योजना करण्याचा निर्णय केला आहे. समाजभवन असणे म्हणजे समाजाची प्रगती हा भाव मनात ठेवू नये. समाज संघटित असणे, शासनाच्या योजनांचा लाभ गरजू, वंचित व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, समाजातील तरुण-तरुणींची यंत्रणा उभी केल्यास समाजाची प्रगती साधने शक्य होईल,’ असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

बल्लारपूरचा गौरव वाढविण्याचे कार्य :

चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम असून अयोध्येत निर्माणाधीन प्रभु श्रीराम मंदिरासाठी सागवान काष्ठ बल्लारपुरातून पाठविण्यात आले. प्रधानमंत्री कार्यालय, संमेलन कक्ष, द्विपक्षीय चर्चा कक्ष, कॅबीनेट सभा कक्ष, प्रधानमंत्री यांचे प्रधान सचिवांचे कार्यालय तसेच भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या टिकवूडपासून तयार करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये