ताज्या घडामोडी

धानोरा बॅरेज मुळे सिंचनाचा प्रश्न सुटेल, पांदन रस्ते बनविण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

ग्रामिण भागात पदयात्रा आणि बैठका आयोजित करून आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार 

चांदा ब्लास्ट

मागील पाच वर्षांत आपण शहरी भागाच्या विकासकामांसह ग्रामिण भागातील विकासकामांनाही प्राधान्य दिले. अनेक गावांत आपण रस्ते, समाजभवन तयार केले आहे. विशेष म्हणजे आपण धानोरा बॅरेजच्या टीपीआरला मंजुरी मिळवून दिली असून हा बॅरेज तयार होताच पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच मतदारसंघ पांदनयुक्त करण्याचा आपला संकल्प असून अनेक गावांत पांदन रस्ते तयार केले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

 आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार हे मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधत केलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. यावेळी भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नामदेव डाऊले, भाजप पदाधिकारी विजय आगरे, विनोद खेवले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह आता ग्रामिण भागातही प्रचाराचा मोर्चा वढवला असून, काल रात्री आणि आज सकाळी त्यांनी ग्रामिण भागात बैठक आणि पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार केला. यावेळी त्यांनी घुग्घुस, चिंचाळा यासह मतदारसंघातील इतर गावांना भेटी देऊन पाच वर्षांत केलेली कामे सांगितली.

ग्रामिण भागात आपण मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला आहे. येथे सामाजिक सभागृह, रस्ते, नाली यासह अनेक विकासकामे आपण पाच वर्षांत केली आहेत. अनेक गावांत पांदन रस्त्यासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढेही अनेक पांदन रस्त्यांची कामे प्रस्तावित असून ती करण्याचा संकल्प आपण केला आहे. धानोरा बॅरेजसाठी आपण अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो. अखेर या बॅरेजच्या टीपीआरला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ग्रामिण भागातील पाणी प्रश्न सुटणार असून 5 ते 6 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रचारादरम्यान ग्रामस्थांचाही मोठा प्रतिसाद आमदार किशोर जोरगेवार यांना मिळत असल्याचे दिसून आले.

आम आदमी पक्षाच्या नकोडा अध्यक्षांचा भाजपात प्रवेश

आम आदमी पक्षाचे नकोडा गावाचे अध्यक्ष गणपत गेडाम यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामिण भागाचा विकास झाला असून त्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आपण पक्षात प्रवेश केला असल्याचे गणपत गेडाम यांनी म्हटले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून गणपत गेडाम यांचे पक्षात स्वागत केले आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या चंद्रपूरात

संध्याकाळी 4 वाजता चांदा क्लब मैदानात होणार भव्य जाहीर सभा

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर असून, चांदा क्लब येथील भव्य मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सभेला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचाराकरिता भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चंद्रपूर आणि घुग्घुस येथे भव्य सभा पार पडली आहे. तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता सदर सभा आयोजित करण्यात आली असून, चांदा क्लब मैदानात ही सभा पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सभेला महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये