ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.लालगुडा शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना: भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त कोरपना तालुक्यातील गडचांदूर केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे “वाचन प्रेरणा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी ,शिक्षक आणि गावकरी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची विचारधारा आणि थोर महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळून गावकऱ्यांनाही वाचनाचे महत्त्व समजून आले.

     एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक पुस्तके वाचावीत व आपल्या जीवनाचा तसेच समाजाचा उद्धार करावा, असे यावेळी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी विद्यार्थी,पालकांना वाचनाचे महत्व पटवून सांगितले.

     संत साहित्याचे व ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपले आरोग्य चांगले राहते, मन प्रसन्न राहते व आपण जीवनात यशस्वी होतो ,असे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी मार्गदर्शन केले.

       यावेळी शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते आणि प्रत्येकाने आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले .काही विद्यार्थ्यांनी कथा,कविता, विनोद ,इत्यादी पुस्तकाचे वाचन केले.

                दरम्यान जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे महत्त्व समजून घेतले, काही विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

   या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, उपाध्यक्ष अमावस्या तोडासे, चंदू पाटील मरस्कोल्हे,भिकाजी सिडाम,देवराव सोयाम ,लक्ष्मण कोडापे,मनीषा मेश्राम,वर्षा कोडापे,आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये