Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय; ना.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट

ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणार भाजीपाला संशोधन केंद्र

चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

याअंतर्गत भाजीपाला पिकात अनुवंश शास्त्राचा अभ्यास करून सुधारित संकरीत वाण विकसित करणे व गुणवत्तापूर्वक उत्पादनास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या देशी वणांचे संवर्धन करणे, दुर्मिळ अशा रान भाज्यांची संवर्धन व लागवड करणे, भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादनासाठी शेडनेट हाऊस, आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स एरोपोनिक्स तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे, भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे, संरक्षित भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान विकसित करुन उत्पादन वाढविणे, भाजीपाला पिकांवर येणाऱ्या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रणाचे प्रभावी उपाय शोधणे, भाजीपाला पिकांची प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि साठवणूक, प्रक्रिया उदयोगास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्राची उद्दिष्ट्ये असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये भाजीपाला उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. तथापि, वातावरणात होणारे बदल व त्यामुळे उद्भवणारे खोड किडीच्या समस्या, कमी टिकवण क्षमता, बदलत्या वातावरणात अनुकूल तंत्रज्ञानाचा अभाव आदी बाबींचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, हळद, वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा इत्यादी भाजीपाल्याचे पिके घेतली जातात. भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त जमीन, मुबलक पाणी व मजुंराची उपलब्धता इत्यादी असल्याने या जिल्ह्यात भाजीपाला लागवडीस मोठा वाव आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याच्या एकार्जुना येथे कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. मात्र, दिवसेंदिवस भाजीपाला पिकांची वाढती मागणी, चांगला बाजारभाव व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी असलेल्या संधी आदी बाबी पाहता भाजीपाला पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे, गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यासाठी या संशोधन केंद्र स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रासाठी 10 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री ना.श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये