ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीतील माजी नगरसेवकाच्या मसाज सेंटरवर धाड

आसामच्या मुलींकडून देहव्यापार होत असल्याची शंका रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- येथील नागपूर महामार्गावरील गीत पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या एका मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी धाड टाकल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक च्या मालकीचे हे मसाज सेंटर असून आसाम राज्यातील मुलींकडून या ठिकाणी देहव्यापार होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यामुळे या प्रकरणात कोणावर गुन्हे दाखल झाले, हे कळू शकले नाही.

ब्रह्मपुरीतील माजी नगरसेवका च्या मालकीचा ब्रह्मपुरी-नागपूर महामार्गावर पेट्रोलपंप आहे. या पंपाच्या मागे मागील कितेक वर्षांपासून मसाज सेंटर चालविले जात आहे. या सेंटरमध्ये आसाम राज्यातील काही मुली ग्राहकांना मसाजची सुविधा देण्यासोबतच देहव्यापार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या मसाज सेंटरमध्ये ब्रह्मपुरी शहरासह आजुबाजुच्या परिसरतील काही धनदांडगे आंबटशौकीन नियमित ग्राहक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना अवैधरित्या मद्य सुद्धा उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले जाते. वृत्त लिहीस्तोवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरूच होती. त्यामुळे या प्रकरणात कोणावर गुन्हे दाखल करण्यात आले, ही माहिती उपलब्ध होवू शकली नाही. सदर मसाज सेंटर माजी नगरसेवकाच्याच मालकीचे असून या सेंटरवर धाड टाकल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.

मात्र, या प्रकरणाचा पंचनामा व इतर कारवाई सुरू असल्याने रविवारी सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ब्रह्मपुरीचे ठाणेदार बानबले यांनीही कारवाई झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या मसाज सेंटर लगत असलेल्या लॉजवर २ ते ३ वेळा चौकशी करण्यात आली. मात्र काहीही आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

*अनेक लॉज व हॉटेलमध्ये अवैध देहव्यापार*

ब्रह्मपुरी शहरातील अनेक लॉज आणि हॉटेलमध्ये अवैधरित्या देहव्यापार सुरू असून या व्यवसायात अल्पवयीन मुली सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक लॉज व हॉटेलवर ओळखपत्र न घेताच हा अवैध देहव्यापार राजरोसपणे सुरू आहे. याबाबतची चौकशी केल्यास मोठे रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये