Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे उर्वरित ५८.९४ कोटी रुपये

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी; ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना दिलासा ; ना. मुनगंटीवार यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन मांडला होता मुद्दा

चांदा ब्लास्ट

 राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची उर्वरित रक्कम मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांना उर्वरित ५८.९४ कोटी रुपये मिळणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता. त्यानंतर १४३.८१ कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले. पण ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांचे ५८.९४ कोटी रुपये प्रलंबित होते.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळाली तरच शेतीचे पुढचे नियोजन करणे शक्य होईल. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आधार होईल, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती.

ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा हफ्त्याचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील उर्वरीत शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. ही बाब देखील पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग त्यामुळे मार्ग सुकर झाला होता. पण उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती.

सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. ना. श्री. मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला. अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

ना. मुनगंटीवार यांचे मानले आभार

पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर पिक विम्याच्या रकमेसाठी आणि आता उर्वरित रकमेसाठी देखील ना. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असलेल्या ना. मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये