जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगात ३५ टक्के महिलांना रोजगार देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : लॉयड्स मेटल्स कंपनीच्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील घुग्घुस शहरात नवीन उद्योग उभारण्यात येत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ३० सप्टेंबर रोजी प्रदूषणाबाबत जनसुनावणीचेही आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीपूर्वी यास्मिन सय्यद आणि महिला क्रांती संघटनेच्या सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलांनी २६ सप्टेंबर रोजी कंपनीविरोधात आंदोलन पुकारले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगात ३५ टक्के महिलांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
घुग्घुस शहरात महिलांना रोजगाराच्या संधी नाहीत, दहा ते बारा तास काम केल्यानंतर त्यांना केवळ तीन हजार ते पाच हजार रुपये मिळतात. गेल्या तीस वर्षांपासून शहरात सुरू असलेल्या एका कंपनीच्या प्रदूषणामुळे शहरातील महिलांना अनेक जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. महिलांनी प्रदुषण खावे का? असा संतप्त सवाल या महिला उपस्थित करत आहेत.
महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने असताना महिलांनी शहरातील दुकाने किंवा हॉटेलमध्ये केवळ तीन ते चार हजार रुपयांत भांडी धुवावीत का?
या प्रदूषणकारी उद्योगाच्या धुळीचा आणि प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या महिलांना कंपनीत नोकरी द्यावी. कंपनीने शहरात मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र व व्यवसाय उपलब्ध करून द्यावेत. अनेक मागण्या घेऊन महिलांसाठी आंदोलन सुरू झाल्याचे प्रथमच दिसून आले आहे. 10 लाखांची भरपाई द्यावी. या महिलांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांकडे मदतीची मागणी केली आहे, त्यांना किती मदत मिळते हे येणारा काळच सांगेल, मात्र या आंदोलनातून महिला त्यांच्या हक्कासाठी जागृत झाल्याचे दिसून येत आहे.
जनसुनावणीत महिलांचा रोष कंपनीला दिसेल, असे यास्मिन सैय्यद यांनी म्हटले आहे.