Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील मनरेगातंर्गत कामगारांची प्रलंबित मजुरी तात्काळ द्या!

मजुरांच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री आक्रमक ; महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा घेतला सविस्तर आढावा

चांदा ब्लास्ट

 मनरेगा अंतर्गत मजुरांची प्रलंबित मजुरी हा संवेदनशील विषय आहे. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांची मजुरी मागील काही महिन्यांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार त्यांच्या हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सदर मजुरी मिळण्यासाठी मजुरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दाद मागितली. मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असून याची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील मनरेगाची मजुरी तातडीने देण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकित दिले.

तसेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी दुरध्वनीद्वारे संवाद साधून केंद्राशी संबंधित सदर मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ देण्याची विनंती ना. मुनगंटीवार यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आयोजित महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी ( रो.ह.यो) शुभम दांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) फरेंद्र कुतीरकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

मनरेगा विभागांतर्गत कामांची उद्दिष्टपुर्ती करीत असताना मजुरांच्या मजुरीचा विचार प्राधान्याने व्हावा, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मजुरांना ७ दिवसात मजूरी देण्याचा कायदा आहे. या कायद्यांतर्गत मजुरांना मजुरी मिळणे अपेक्षित आहे. कष्टकरी गरीब कामगारांची मजुरी वेळेत देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्यात.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद:

मागील काही महिन्यांपासून मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी ही शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सदर कामगारांच्या मजुरीचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

प्रलंबित मजुरी मिळण्यासाठी मनरेगा सचिवांना दूरध्वनीद्वारे दिले निर्देश:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना एक वर्षांत किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तसेच केलेल्या कामाची मजुरी सात दिवसात देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांची मजूरी शासन स्तरावर प्रलंबित असून मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनरेगा सचिवांना दूरध्वनीद्वारे दिलेत.

बचत गट भवनाचे मॉडेल डिझाईन करा:

महिलांच्या प्रभाग संघासाठी बचत गट भवन उभारण्याचे नियोजन असून बचत गट उभारताना स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, सोलर व्यवस्था, वॉल कंपाऊंड, पेव्हींग ब्लॉक, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, भिंतीवर स्लोगन्स, विद्युत व्यवस्था, परिसर सौंदर्यीकरण तसेच महिलांचे उत्पादन विक्री करिता दुकान आदी व्यवस्था कराव्यात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये