Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाचन आणि शिक्षण, जीवनाच्या उद्दिष्टांना साकार करण्याचा मार्ग – आ. जोरगेवार

धनोजे कुणबी समाज मंदिर येथे १ कोटी रुपयांच्या अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट

वाचन आणि शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञानाचा संग्रह नसून, आपल्या विचारसरणीला घडवणारे आणि जीवनाच्या उद्दिष्टांना साकार करण्याचा मार्ग आहेत. समाजातील प्रत्येक मुलाला योग्य आणि प्रगत शिक्षण मिळावे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण ज्या अभ्यासिकेची पायाभरणी करतोय, ती या दिशेने एक मोठी पायरी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्ष्मीनगर येथील धनोजे कुणबी समाज मंदिर येथे अभ्यासिकेसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अॅड. पुरुषोत्तम सातपुते, समाज मंदिराचे सचिव अनुप देउळकर, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, सल्लागार मनोहर पाउनकर, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सदस्य महेश खंगार, भाऊराव झाडे, सुधाकर जोगी, डॉ. मीना माथनकर, नीता पावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, की आजवर अनेक नागरिक रस्ते, नाले, शेड यांसाठी मागणी करतात. तीही गरज आहेच, परंतु धनोजे कुणबी समाजाने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची मागणी केली, आणि मी लगेच या वाचनालयासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

मतदारसंघात ११ अभ्यासिका तयार करण्याचा आपला संकल्प पूर्ण होत आहे, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. शासकीय ११ अभ्यासिका असणारे हे कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ असल्याचेही ते म्हणाले.

पवित्र दीक्षाभूमी येथे एक अभ्यासिका तयार झाली आहे, जिथे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. तर रामनगर आणि बाबुपेठ येथे ४ कोटी रुपयांतून अभ्यासिका तयार होत आहे. बाबुपेठ येथील अभ्यासिकेचे काम गतीने सुरू आहे. या भागातील प्रतिभावंत विद्यार्थी पुढे आले पाहिजेत आणि त्यांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या अभ्यासिकांमध्ये मोफत अभ्यास करण्याची संधी मिळावी, या हेतूने आपण मतदारसंघात अभ्यासिकांचे जाळे तयार करत असल्याचे आ. जोरगेवार म्हणाले.

धनोजे कुणबी समाज हा नेहमी सामाजिक कार्यात पुढे असतो. शिक्षित समाज असून त्यांच्या जागेवर अभ्यासिका तयार करण्याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मुलांच्या शिक्षणाला योग्य वातावरण, साधनसामग्री, आणि मार्गदर्शन मिळाले तरच ते या स्पर्धेत यशस्वी होऊ शकतात. या अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थी शांतपणे अभ्यास करू शकतील, मार्गदर्शन मिळवू शकतील, आणि आपली क्षमता ओळखू शकतील. हे स्थान विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची उभारणी करण्यासाठी एक पायाभूत संस्था बनावे, असेही आ. जोरगेवार यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये