Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वृद्धाश्रमातील महिलांच्या वात्सल्याने भारावल्या जेसीआय राजुरा रॉयल्सच्या सदस्या

चिंचोली येथील महात्मा फुले वृद्धाश्रमाच्या महिलांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रु

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

 

राजुरा पासुन पंधरा किलोमीटर अंतरावरील चिंचोली खुर्द येथील महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रमाला जेसीआय राजुरा रॉयल्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांच्या नेतृत्वात भेट देऊन कुटुंबापासून दुरावलेल्या मातांची भेट घेऊन प्रेमाला पारख्या झालेल्या वृद्धांकडून प्रेमवर्षाव अनुभवला. कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपल्या कुटुंबियांपासुन  दुरावलेल्या जेष्ठ नागरिकांशी हितगुज करून त्यांना मायेचा ओलावा देण्याचा प्रयत्न करतांना जेसीआय सदस्या भावुक झाल्या होत्या.

ह्या वात्सल्य भेटीत बोलतांना अध्यक्षा स्वरूपा झंवर म्हणाल्या की, वृद्धाश्रमात आई वडील राहणे, ही समाज स्वास्थासाठी चांगली बाब नाही. भारतीय कुटुंब पद्धतीत सर्वांनी मिळून राहणे, आपल्या ज्येष्ठांची जबाबदारी कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वीकारणे ह्यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात. नव्या पिढीला आजी आजोबांचे प्रेम मिळणे अत्यंत गरजेचे असते. आईच्या प्रेमाला उपमा नाही पण दुधापेक्षा साईला जसे जास्त महत्त्व असते तसेच आजी आजोबांना आपल्या नातवंडांचे विशेष कौतुक असते. मात्र घरातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात राहावे लागत असेल तर ह्यापेक्षा मोठी दुर्दैवी परिस्थिती त्या कुटुंबात दुसरी असु शकत नाही. आजी आजोबांच्या प्रेमालाच नव्हे तर त्या कुटुंबातील मुले आपल्या संस्कृतीपासूनही दुरावले जातात व स्वाभाविकपणे त्यांच्या बालमनावर आईवडिलांची वृद्धापकाळात काळजी घ्यायची असते त्यांची सेवा करायची असते तसेच त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करायची असते हे संस्कार अशा घरातील मुलांवर होत नाही.

परंतु अपरिहार्यता म्हणून वृद्धाश्रमाचा आधार घेतलेल्या वृद्धांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना आपुलकीची व मायेची वागणूक मिळावी तसेच त्यांच्या आयुष्यात आलेला रिक्तपणा नाहीसा व्हावा ह्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असुन राजुरा सारख्या सीमावर्ती तालुक्यात महात्मा फुले वृद्धाश्रमात वास्तव्य करणााऱ्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील समाधान ह्या वृद्धाश्रमातील मातांच्या चेहऱ्यावर दिसत असून ज्येष्ठांची योग्य काळजी घेणााऱ्या ह्या वृद्धाश्रमाच्या संचालकांची व सर्व कर्मचाऱ्यांची कृती अभिनंदनीय आहे अशी भावना जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शिक्षिका मालू राऊत यांनी या वृद्धाश्रमात उपलब्ध असलेल्या सर्व आवश्यक सुविधा, त्यांच्यासाठी असलेली राहण्याची, जेवण्याची तसेच इतर सर्व व्यवस्था जेसिआय सदस्यांना दाखविली तसेच सर्व वृद्ध मातांशी भेट घडवुन दिली.

जणु आपल्याच मातांना भेटायला गेलेल्या महिलांनी सर्व वृद्धांना  जीवनावश्यक वस्तूंची कीट तसेच लेकिंकडून बिस्किट, टोस्ट, ताक, चिवडा, फळे, नैपकिन आदी खाद्यपदार्थ व भेट वस्तू देण्यात आल्या. आप्तांपासून दुरावलेल्या मातांनीही  जेसीआय राजुरा रॉयल्स क्लबच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर , जयश्री शेंडे, राधिका धनपावडे, अनुष्का रैच, सुषमा शुक्ला, स्मृती व्यवहारे, अल्का सदावर्ते, पूजा घरोटे, नम्रता खनगन, नम्रता खोंड यांचेसह जे. सी. आय राजुरा रॉयल्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांवर प्रेमवर्षाव करून रिक्त हृदयातील भावना ताज्या असल्याची अनुभूती दिली. ह्या प्रसंगी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अशोक पवार, शिक्षक प्रविण गुडपल्ले, शिक्षिका साधना डाहुले, अर्चना मेश्राम यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये