जिल्हातील रेल्वे सुविधा सुधारण्यावर भर देणार – खासदार प्रतिभा धानोरकर
चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील नागरीकांसाठी रेल्वे सुविधा अत्यावश्यक असून वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे सुविधेत वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे द्वारा आयोजित बैठकीत केले. सदर बैठक नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे संपन्न झाली.
दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे बैठकीचे आयोजन दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वेच्या समस्यांबद्दल अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन वर इलेक्ट्रिक लाईट, सीसीटिव्ही कॅमेरा यासारख्या अत्यावश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
बिलासपूर-चेन्नई सेंट्रल(12851/12852) या गाडीचा चांदाफोर्ट येथे थांबा देण्याची मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. जबलपूर-चांदाफोर्ट हि गाडी मागील वर्षी सुरु झाली असून सदर गाडीचा थांबा नागभीड पर्यंत आहे. सदर गाडी बल्लारपूर पर्यंत आल्यास चंद्रपूर शहरासह आजु-बाजूच्या गावातील नागरिकांना याचा लाभ मिळेल. त्याच सोबत सदर गाडीला मुल येथे देखील थांबा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. बल्लारपूर, नागभीड, गोंदिया या मार्गावरील अनेक गाड्या अनियमित वेळेवर चालत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर गाड्या नियमित वेळेत चालाव्यात या करीता रेल्वे प्रशासनाला सुचना केल्या. चांदाफोर्ट-नागभीड-गोंदिया मेमु पॅसेंजर 10 ऑगस्ट 2023 पासून बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर गाडी तात्काळ प्रवाशांच्या सेवेत दाखल करावी.
यासोबतच बल्लारपूर-नागभीड-गोंदिया यामध्ये दुसऱ्या लाईन चे विद्युतीकरणासोबत काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी देखील मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. रेल्वे मुळे वन्य प्राण्यांचे मृत्यमुखी होण्याचे प्रमाण वाढले असून यावर रेल्वे प्रशासनाने आवश्यक सुधारणा कराव्या. सोबतच अनेक ठिकाणी पावसळ्यात अंडरपास मध्ये पाणी जमा होऊन शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता त्रास होतो, यावर उपाययोजना कराव्यात असे देखील खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. वरील सर्व मागण्यांसंदर्भात लवकरच तोडगा निघणार असल्याचे दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.