Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रांजळ, मेहनती आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : प्राचार्य डॉ.संभाजी वारकड सर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जीवनाच्या प्रवासात अनेक व्यक्तींचा सहवास लाभतो परंतु काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाने आपण प्रभावित होतो. सतत काम करण्याची हातोटी,प्रचंड परिश्रम घेण्याची प्रवृत्ती आणि कशाही स्थितीत नाउमेद न होता गड सर करण्याची जिद्य या सर्व गोष्टी ज्यांच्यात अंतर्भूत आहेत असे व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य डॉ. संभाजी वारकड सर होय.

सरांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ, मनमिळावू ,समंजस, निरंहकारी, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टीचे आहे. सरांचे बालपण जिवती सारख्या अतिदुर्गम भागात गेले. घरातील वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असल्यामुळे सर्व मंगल मांगल्याचीच भावना जोपासत सर्वतोपरी गरजूंना मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. सांप्रदायिकतेमुळे नैतिक आचरण शुद्ध आहे. प्रेमळ, दिलखुलास, प्रभावी रुबाबदार असे राजबिंडे व्यक्तिमत्व सरांना लाभले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे जन्म झाल्यानंतर, दमपुर मोहदा येथील आश्रम शाळेतून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ते उदयगिरी महाविद्यालय उदगीर असा होत शैक्षणिक आलेख वाढतच राहिला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कायम प्राविण्य प्राप्त केले आहे. इंग्रजी सारख्या विषयात एम.ए. अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून मेरिट लिस्ट येण्याचा मान त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन मिळविला त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा आयोजित इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर तामिळनाडू राज्यातून इंग्रजीमध्ये एम फिल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएचडी ही आचार्य पदवी मिळविले.सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे नोकरीवर रुजू झाले. सतत कार्यमग्न असणारे व्यासंगी,परिश्रमी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रा संभाजी वारकड यांनी सरदार पटेल महाविद्यालयांमध्ये अल्पावधीतच वेगळा ठसा उमटविला. दहा वर्ष सातत्यपूर्ण अध्यापनाने आणि प्रभावी संभाषण कौशल्यामुळे ते कायम विद्यार्थी प्रिय व कर्मचारीप्रिय राहिले. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विविध पुरोगामी संघटनात सक्रिय काम करीत समाजातील गरीब, उपेक्षित, होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात सर नेहमी अग्रेसर असतात.देवराव भोंगळे, नामदेव देवकते,प्राचार्य पांडुरंग सावंत या सारखे अनेक विद्यार्थी सरांचे गौरवाने आजही नाव घेतात. कोणाचाही द्वेष, मत्सर न करता हेवा,असूया न ठेवता सहानुभवाने सौजन्यपूर्ण व्यवहार करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य संभाजी वारकड सर होय.

प्रारंभी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक,त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालय कोरपना येथे प्राचार्य तिथून राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली स्थापनेनंतर इंग्रजी भाषा अभ्यास मंडळ, त्यानंतर विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले त्यानंतर अकॅडमी कौन्सिल, विज्ञान व तंत्रज्ञान भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमचे सहसचिव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य तसेच कै. बापूजी पाटील मामुलकर स्मृति प्रतिष्ठानचे संचालक अशा विविध प्राधिकरणावर प्रभावी आणि यशस्वीपणे त्यांनी कार्य केले आहे. इंग्रजी विषयात अकरा पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी प्राप्त केली आहे व सध्या सहा विद्यार्थी आचार्य पदवी प्रबंधाचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शोधनिबंध व डझनभर पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा सेमिनार व परिषदा त्यांनी कोरपना व राजुरा येथील महाविद्यालयात यशस्वीपणे आयोजित करून महाविद्यालयाचा संपर्क जगभरातील बऱ्याच देशाशी स्थापन केलेला आहे.ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांना विविध शासकीय नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील .त्यासाठी कोणते परिश्रम घ्यायला हवे याविषयी सर सदोदित प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. त्याचेच फलित म्हणजे माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम जिवती तालुक्यातील गरीब ,होतकरू विद्यार्थ्याकरिता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती तालुका सर्व व्यापी सेवा फाउंडेशनची निर्मिती झाली .त्यातून चंद्रपुरात तुकुम येथे मोफत अभ्यासिका चालविली त्यातून चार महिन्यात तब्बल २४ विद्यार्थी विविध शासकीय सेवेत लागले. अशा सामाजिक कार्यात सर नेहमी पुढाकार घेतात.

राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयात विविध कोर्सेस आणून जी प्रगती केली आहे त्यात सरांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.. राजुरा बस स्थानकासमोर वाचनालय सुरू करण्यात सरांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या अंगाने सर नेहमी कार्य करतात. स्वतः प्रतिकुलतेवर मात करीत उच्च शिक्षण घेऊन ते नोकरीवर रुजू झाले .किंबहुना महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्नीला उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून यशस्वी अध्यापिका बनविले. होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास कायम मनी बाळगत या उपजत झऱ्यांना मोकळे करुन विकसित करता येईल, यासाठीचे सरांचे प्रयत्न अहोरात्र सुरू असतात.

प्रयत्नपूर्वक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून आपल्यासारख्या धडपडणाऱ्या अनेकांना विविध संधी उपलब्ध कशा होतील व त्यांनाही स्वावलंबी कसे होता येईल, या ध्यासाने प्रयत्नरत असतात. जिवती तालुक्याकरिता ते आदर्श असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. तालुक्यातील. प्रा .राजकुमार मुसणे,डॉ.माधव कांडनगिरे, प्रा.ज्ञानेश्वर गिरमाजी,प्रा.तुकाराम गिरमाजी, प्रा.महेश देवकते,प्रा. चेतना चव्हाण, रमेश राठोड असे कितीतरी व्यक्ती प्राचार्य संभाजी वारकड यांना प्रेरणास्थानी मानतात.जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सरांचा सल्ला अवश्य घेतात.आज डॉ.वारकड सर वयाचे पन्नास वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही सतत बारा तास एका जागी बसून कार्य करण्याची त्यांची क्षमता वाखाण्ण्यासारखी आहे. अर्थातच तरुणांनाही लाजवेल असे उत्साही व सदाबहार व्यक्तिमत्व त्यांचे आहे. प्रा. अंजली वारकड, या अर्धांगिनी,आदित्य व श्रीनिवास हे दोन अपत्य आणि इतर बराचसा गोतावळा आहे.सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या व पुढील भावी उज्वल आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

प्रा. डॉ. राजकुमार मुसणे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये