Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी बोली साहित्य संघाचा २० वा वर्धापनदिन संपन्न

बोलीतच विचार करून बोलीतच लेखन केले पाहिजे - डॉ. हरिश्चंद्र बोरकर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

          मराठी बोली मंडळाचा मराठी बोली वर्धापन दिनाचा आँनलाईन कार्यक्रम संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर (साकोली)यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसमेलनासह संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून बोली साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण लळीत, ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे यांची उपस्थिती होती. श्रोते म्हणून महाराष्ट्रातील विविध बोली चे अभ्यासक तसेच बोली संघाचे सचिव डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे(भंडारा), डॉ. चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली)प्रामुख्याने उपस्थित होते

             मराठीतील अनेक बोलींचे एक मंडळ राज्यात कार्यरत आहे. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली बोली वर्धापन दिनानिमित्त निमंत्रितांचे कवी संमेलनही आभासी पद्धतीने घेण्यात आले. बोली साहित्य संघाचे समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर) यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. लखनसिंह कटरे (बोरकन्हार) यांनी केले. ते म्हणाले, मराठी बोलींचा हा झेंडा बोरकरांनी गाडल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले. जोपर्यंत बोली आहे तोपर्यंत मराठी जिवंत आहे. बोलीला विसरून चालणार नाही. बोलीतील शब्द म्हणजे अमृतधारा असे आहे. गावांमध्ये आजही बोली बोलणारे खंदे कार्यकर्ते आहेत. दैनंदिन बोलीत ज्या संकल्पना आम्ही समजावून सांगतो, ज्या पद्धतीने सांगतो की, ज्यामुळे समोरच्याला अलगद लक्षात येते. ती आपुलकी, ती जीवाला जीव देणारी बोली आमचा अमूल्य ठेवा आहे. महाराष्ट्रात जवळपास साठ बोली आहेत. शहरी माणसाने सुद्धा निःशंकोच बोलीचा वापर करावा , असे ते म्हणाले.

            प्रमुख अतिथी डॉ. बाळकृष्ण लळीत (शिरूर) यांनी मालवणी बोलीसाठी कार्य केल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले, साहित्यिकांनी बोलीला दुर्लक्षित करु नये. पुण्यात कार्यरत असतांना हे चित्र मी स्वतः अभ्यासले आहे. सरोजिनी बाबर, इंदिरा संत यांनी माय मराठीला समृद्ध करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनी बोलीला महत्व दिले असेही डॉ. लळीत यांनी सांगितले.

     प्रमुख अतिथींच्या मनोगतानंतर काव्य संमेलनाला सुरुवात झाली. डॉ. कन्नुलाल विटोरे यांनी कहारी भाषेतील काव्यरचना आपल्या खास शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. निलेश कवडे यांनी वऱ्हाडी कविता सादर केली. तर रवींद्र दळवी यांच्या ‘भाकरीची कहाणी’ या काव्याने हृदयाला हात घातला. यानंतर संधी दिली ती गझलकार लोकरामजी शेंडे (नागपूर) यांना.यावेळी त्यांनी सादर केलेली झाडीबोलीतील रचना ‘

*सयरा मंदी विकते बोली*

*खेड्यामंदी पिकते बोली*

 श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली तर ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो (गोवा) यांनी मालवणी भाषेत आईची महती विशद करणारी ‘माय’ ही कविता सादर केली. या गेय कवितेने आपापली माय आठवायला भाग पाडले.

  उपेंद्र रोहनकर, गडचिरोली यांनी ‘मनाचे भ्रम’ ही झाडीतील कविता विनोदी अंगाने प्रस्तुत केली . विजय निकम यांनी अहिराणी बोलीतून मायेवर सुंदर गझल सादर केली. जीवनाला आकार देणारी माय. पालिकचंद बिसने (लाखनी )यांनी ‘मिटू’ ही पोवारी भाषेतील कविता सादर केली. पोपटाचा रंग, विशिष्ट आकार, मानवाप्रमाणे शिकवलेले बोलणे तरीही त्याला जाळ्यात न अडकविता मुक्त संचार करू द्यावे असा संदेश देणारी ‘मिटू’ ही कविता होती. डॉ. इंद्रकला बोपचे (गोंदिया) यांनी ‘कसा जमानो आयो’ ही पोवारी भाषेतील कविता बदललेल्या मानवी वृत्तीचे दर्शन घडवून देणारी ठरली.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर याप्रसंगी म्हणाले, बोलीचे तुकडे करणारा हा बोरकर नाही तर बोलीचे संवर्धन करण्यासाठी जन्मलेला हा पाईक आहे. एकमेकांच्या कवितांवर टाळ्या मिळविण्यासाठी कविता न लिहिता, मराठीत विचार करून भाषांतर करून बोलीत न लिहिता, बोलीतच विचार करून बोलीतच अस्सल लेखन करावे असा सल्ला त्यांनी दिला. भाषांतर करून अनुवाद करून काव्य लेखन करणे थांबवावे असे आवाहन केले. आपल्या सभोवतालचा परिसर आपल्या काव्यातून उभा राहावा असे काव्य आपणास मोठे बनवते, हा अनमोल सल्लाही त्यांनी दिला.

   जशी शोकांतिका बोलीची आहे; तीच शोकांतिका प्रमाण भाषेची आहे; तीच शोकांतिका भारतीय भाषेची आहे. तरीही बोलीतून सातत्याने लेखन करून यशाचं शिखर गाठावं आणि बोलीचा पुरस्कार मिळावा ही अंतरीची आशा बोलून दाखविली.

          कार्यक्रमाचे तंत्र नियोजनकार कुंजीराम गोंधळे यांनी सांभाळले तर डॉ. रावसाहेब काळे यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये