Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुती सरकार पुन्‍हा निवडून आल्‍यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढविणार- ना. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांची ग्‍वाही

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

महाराष्‍ट्रात पुढील निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्‍यास मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्‍कम निश्चित पणे वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करीन असे उद्गार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्‍हणाले 2,81,000 बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकताना मला अतिशय आनंद झाला. कुठल्याही जातीची असो धर्माची असो रंगाची असो याचा विचार न करता महाराष्ट्रातील सर्व बहिणींना पंधराशे रुपये महिना मिळावा या दृष्टीने सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. या वेळी मंचावर भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपा ग्रामीण जिल्‍हा अध्‍यक्ष हरिश शर्मा, बल्‍लारपूर शहर महिला भाजपा अध्‍यक्ष वैशाली जोशी तथा महिला भाजपा पदाधिकारी उपस्थित होत्‍या.

या वेळी आधी 17 ऑगस्‍टला पैसे टाकावे असा सरकारचा विचार होता परंतु इतक्या सर्व बहिणींच्या खात्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एवढे पैसे जमा होण्यास त्रास होईल या विचाराने 15 ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला व हळूहळू तो पूर्णत्वाला नेण्याचा आनंद आम्हाला झाला आहे. हा आमच्या भगिनींच्या हक्काचा पैसा आहे आणि हा त्यांना मिळायलाच हवा या उद्देशाने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला याचाही मला अतिशय आनंद आहे.

यामध्ये ज्या बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित असतील त्या सर्व बहिणींनी अजूनही फॉर्म भरावा 31 ऑगस्ट पर्यंत ज्या बहिणी फॉर्म भरतील त्यांना जुलै व ऑगस्ट चे पैसे एकत्रितपणे मिळतील. ज्या बहिणी 31 ऑगस्ट पर्यंत ही फॉर्म भरू शकणार नाही त्यांनी सुद्धा चिंता करू नये त्यांचा हा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना यातील प्रत्येक भगिनीला मिळेल याची खात्री मी देतो.

मी चंदनसिंग चंदेल हरीश शर्मा व त्यांच्या संपूर्ण चमुचे इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करतो. आणखी एका गोष्टीबद्दल चंदनसिंग चंदेल यांचे मी कौतुक करतो संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बूथ प्रमुख म्हणून एका पुरुषाबरोबर एका महिलेची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. एका बुथवर दहा महिलांची नियुक्ती सुद्धा त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले की, रक्षाबंधनचा हा धागा इतका मजबूत आहे की आपले हे नाते कोणीही तोडू शकत नाही. आज मी प्रतीकात्मक पद्धतीने काही बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे. समोर बसलेल्या माझ्या तमाम बहिणींना मला राखी बांधण्याची इच्छा आहे याची मला जाणीव आहे. परंतु वेळेअभावी हे शक्य नाही म्हणून चंदन सिंग चंदेल यांनी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला व त्याची संपूर्ण माहिती ते मला देणार आहेत. तो फॉर्म मला मिळाल्यावर तुम्ही राखी बांधल्याचा आनंद मला मिळणार आहे. खरे तर इथेच मी सर्व बहिणींना काही भेटवस्तू देण्यासाठी सांगितले होते परंतु वेळेअभावी ते शक्य होत नसल्याने ज्या बहिणींनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व बहिणींना पुढील दोन तीन दिवसात ही भेटवस्तू मिळेल.

ही योजना सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षाच्या पोटात दुखायला लागलं विधानसभेत अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाल्याबरोबर विरोधी पक्षाचे लोक बाहेर आले तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. ज्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले त्याकरता ज्यांच्या पोटात दुखत ते तुमचे सख्खे भाऊ असू शकत नाही तर निश्चितपणे ते तुमचे सावत्र भाऊ असतील.

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या बाबतीत असा निर्णय घेतला आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना अभियांत्रिकी वैद्यकीय व तत्सम अभ्यासक्रमांची संपूर्ण फी महाराष्ट्र सरकार भरेल हे कदाचित त्या भगिनीला माहिती नसेल जिने या योजनेवर टिका केली व मुलींचे शिक्षण मोफत करण्‍याविषयी सरकारला सुचविले. महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी बस मध्ये तिकिटाचे अर्धे पैसे लागतील अशी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये आपण कुठेही आणि केव्हाही जाऊ शकता.

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहन करण्याची शक्ती जास्त असते परंतु शेवटी शरीर आहे तेही थकत असतं त्यामुळे आम्ही बल्लारपूर साठी काही योजना सुरू करीत आहोत ज्यामध्ये कॅन्सर चेकअप कॅम्प पुढील काही दिवसात आम्ही बल्‍लारपूर मध्ये आयोजित करीत आहोत. रक्षाबंधनच्या या पवित्र पर्वावर मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की यापुढे आवास योजनेची जी घरे बनतील ती आपल्या सर्व भगिनींच्या नावावर राहणार आहेत. बरेच वेळा महिला आपल्या डोळ्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करतात व नंतर त्याचा त्यांना प्रचंड त्रास होतो त्याकरता बल्लारपूर येथे नेत्रचिकित्सा शिबिर व आवश्यकता पडल्यास चष्मा वाटप व ऑपरेशन हे सर्व कार्यक्रम पुढील काही दिवसात मोफत राबविले जाते.

ज्या घरी स्त्रीचा सन्मान आहे ते घर अतिशय समाधानी असते. यामुळेच केंद्र सरकारने नारी से नारायणी तक हा नारा देऊन महिलांसाठी अनेक योजनांची सुरुवात केलेली आहे. 12000 पेक्षा जास्त कुटुंब इथे तीन प्रकारच्या जमिनीवर वास्तव्य करून आहेत व त्यांचे स्थायी पट्टे अजून झालेले नाहीत पुढील काही दिवसात पट्टे वाटप कार्यक्रमाला सुरुवात होऊन लवकरच हे काम पूर्ण होईल. या पट्ट्यांवर सुद्धा पती व पत्नी दोघांचेही नाव एकत्रित टाकायचे असा आमचा प्रयत्न राहणार आहे.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, आपल्याला आता अतिशय सावध राहायची आवश्यकता आहे. कारण सावत्र भाऊ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फसवू शकतात. सरकारच्‍या चांगल्‍या येाजनांबद्दल आपल्‍यामध्‍ये भ्रम पसरवु शकतात. तेव्‍हा कुठल्‍याही प्रकारच्‍या चक्रव्‍युव्‍हात न फसता सरकारी योजनांचा लाभ घ्‍यावा. कार्यक्रमानंतर अनेक भगीनींनी उत्‍साहात ना. मुनगंटीवार यांना राखी बांधली. ना. मुनगंटीवार यांनी सुध्‍दा अतिशय आनंदाने भगीनींकडून राखी बांधून घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये