Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“शालेय मंत्रीमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली आधुनिक निवडणूक प्रक्रियेची माहिती”

कोरपना येथील स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – आगामी काळात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील राज्यशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. पी. जे. गेडाम यांनी शालेय विद्यार्थ्यांना वर्ग निहाय निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला आणि ही प्रक्रिया राबविली.

विद्यार्थी झाले मतदान अधिकारी विद्यार्थ्यांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली. मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्ग ११ व १२ कला/विज्ञान प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक गुप्त मतदान करून घेण्यात आली. यामाध्यमातून विविध समिती नियुक्त केल्या जाईल. शाळेतील २७७ विद्यार्थ्यांनी या शालेय मतदानात भाग घेतला व मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून उत्स्फूर्ततेने मतदान केले. यावेळेस *९६.८५%* इतके मतदान झाले.

शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन प्राचार्य श्री . बी. जी. खडसे यांनी अभिनंदन केले. तसेच निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन देखील केले.

अभिप्राय:

“आज मतदान करतांना मोठी माणसे कसे मतदान करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या निवडणूक उपक्रमामुळे आम्हाला समजले”. : कु. पूजा योगेश माजरे (११ वी विज्ञान)

“आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली. मतदाना बाबतचा नवीन अनुभव आम्हाला मिळाला”.: कृष्णा उत्तम मडावी (१२ वी विज्ञान)

“लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विदयार्थी जागरूक नागरिक तयार होतील. इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे व यशस्वी झालेल्या उमेदवरांचे अभिनंदन”.: श्री. बी. जी. खडसे (प्राचार्य)

“लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली”. : श्री. पी. जे. गेडाम (राज्यशास्त्र विभाग प्रमुख)

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रणदिवे सर, श्री. उपलंचीवार सर, श्री. जाधव सर, श्री. गेडाम सर, श्री. गावडे सर, श्री. कवठे सर, कु. पतरंगे मॅडम, कु. वनकर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सध्या या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची सर्वत्रच चर्चा होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये