Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक आदिवासी दिनी संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा – आ. किशोर जोरगेवार

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

जागतिक आदिवासी दिन हा दिवस केवळ एक सण किंवा उत्सव नसून, आपल्या आदिवासी बांधवांच्या संघर्ष, संस्कृती, आणि त्यांच्या अनमोल योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आजचा हा दिवस साजरा करत असताना, चिंतन मंथन करून संस्कृतीचे जतन आणि विकासाचा संकल्प करा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    आदिवासी विकास विभाग आणि विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कारागृहातून निघालेल्या रॅलीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर सदर रॅली प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात पोहोचली, येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, यंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मसराम, प्रमोद बोरीकर, सुरेश पेंदाम, अफ्रोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश मडावी, विजय सुरपाम, रंजित मडावी, दिनेश परतेकी, अविनाश मडावी आदि उपस्थित होते.

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आदिवासी समुदायांनी आपल्या मातीतून घेतलेल्या संस्कारांना जपले आहे, आणि त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला निसर्गाशी असलेल्या जवळीकतेची ओळख होते. आपली भाषा, कला, संगीत, नृत्य, आणि रीती-रिवाज हे आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या परंपरांनी आपल्या समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला आहे – आपल्या निसर्गाशी, आपल्या पर्यावरणाशी, आणि आपल्या सामाजिक नात्यांशी. आदिवासी समाजाच्या संघर्षाची कहाणी फार जुनी आहे. आत्मविश्वासाने आणि संघर्षाने आपण आपली ओळख कायम ठेवली आहे. आपली संस्कृतीची समृद्धता आणि जीवनशैली अनेक बाबतीत मार्गदर्शन करत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

      आदिवासी समाजाने आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. आपण या जिल्हाचे मालक आहात त्यामुळे मालकाच्या भूमिकेत आपण असले पाहिजे. शासनाच्या विविध योजना अशा आयोजनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समाजातील विद्यार्थी प्रतिभावान आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचेही ते या प्रसंगी म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये