Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनपातर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली हिरवी झेंडी

१३ शाळांच्या १ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा यात्रा शनिवार १० ऑगस्ट रोजी महापालिका येथून काढण्यात आली. चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते यात्रेतही सहभागी झाले होते.

यावेळी उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त मंगेश खवले, शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नित, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, डॉ. नयना उत्तरवार, उपअभियंता रवींद्र हजारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, तिरंगा केवळ तीन रंगांमध्ये नाही, तर त्यात आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची आशा, स्वप्ने आणि संकल्पना दडलेली आहेत. तिरंग्यातील अशोक चक्र आपल्याला धर्म, न्याय आणि सत्य यांचे पालन करण्यास प्रेरित करतो. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविली जात आहे. आपण कार्यालयातून प्रत्येकाला तिरंगा उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम राज्य शासनाद्वारे राबविली जात आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतले जात असून, आज काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेत शहरातील १३ शाळांचे १ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यात्रेतील वातावरण वंदे मातरम्, जय हिंद, भारत माता की जय च्या घोषणांनी उत्साहीत झाले होते. तसेच सर्व उपस्थितांच्या हातात राष्ट्रध्वज, सर्व विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगी रंगाचे फुगे असल्याने शहर तिरंगामय झाले होते. परिसरात ठेवलेल्या कॅनव्हासवर सर्वांनी भारत माता की जय व जय हिंद लिहून मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे व राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी शहरातील एफईएस गर्ल्स शाळा, किडवाई हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, लोकमान्य टिळक विद्यालय, सिटी कन्या शाळा, नेहरू हिंदी सिटी विद्यालय इत्यादी मनपा व खासगी शाळा तसेच युवक, वृद्ध, पुरुष, स्त्रिया, स्वयंसेवी संस्थांनीही यात्रेत सहभाग दर्शविला. याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले यांनी उपस्थित सर्वांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन तिरंगा यात्रेला सुरुवात केली. यात्रा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीपासून सुरू होऊन आझाद बगीचा चौक ते गिरनार चौक फिरून गांधी चौकात संपन्न झाली. यावेळी सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग तसेच मनपा शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये