Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पिक विम्या संदर्भात मुंबई येथे कृषीमंत्री यांच्या समवेत 7 ऑगस्टला तातडीची बैठक

चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत. अर्थसंकल्पात राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात तातडीने मुंबई येथे कृषी मंत्री व सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश आढाव, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण क्लेम रक्कम 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपये आहे. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचे क्लेम आहेत. यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली असून या आठवड्यात म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत 63 कोटी रुपये जवळपास 30 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येईल. याचा लाभ जवळपास 32 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 13462 शेतकऱ्यांनी आणि काढणी पश्चत 21795 शेतकऱ्यांनी सूचना देवूनही सर्व्हे करण्यात आला नाही, हा विषय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेकरिता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र या कंपनीसंदर्भात अनेक तक्रारी असून कंपनीची कार्यप्रणाली अतिशय बेजबाबदार आहे. त्यामुळे या कंपनीला बडतर्फ करण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात येईल. विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्व्हेची प्रत शेतकऱ्यांना देतात. मात्र ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विम्याची प्रत देत नाही ही बाब गंभीर आहे. तसेच विम्याकरिता तालुक्याचे पर्जन्यमान गृहित धरण्याबाबत सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा मिळालाच पाहिजे, त्यासाठी कंपनीने त्वरित सर्व्हे करावे, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एकाच गावातील एका शेतकऱ्याला विम्याची रक्कम दिली जाते, मात्र दुसऱ्याला दिली जात नाही. कंपनीचे एजंट सर्व्हे करायला जात नाही. पर्जन्यमान झाले नाही, असा सरसकट शेरा मारतात. शेतकऱ्यांच्या पीक विम्या बाबत कंपनीला कोणतेही गांभीर्य नाही. 72 तासात शेतकऱ्यांना अर्ज करायला लावतात, मात्र 2-2 महिने सर्व्हेला जात नाहीत, या बाबी नागरिकांच्या तक्रारीतून समोर आल्या आहेत. त्यामुळे या बाबींची गंभीर दखल घेऊन कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, किंवा राज्य शासनाला सांगून बडतर्फ करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

7 ऑगस्टला मुंबईत बैठक तर 10 ऑगस्टला चंद्रपूरात बैठक

पीक विम्याची समस्या सोडविण्यासाठी 07 ऑगस्टला मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. या बैठकीला ओरिएंटल कंपनीचे अधिकार उपस्थित राहणार आहेत. यासोबतच या पीक विमासंदर्भात कृषी सचिव व्ही. राधा यांच्यासोबत चंद्रपूर येथे 10 ऑगस्टला बैठक होणार आहे, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये