मादगी समाजाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

चांदा ब्लास्ट
अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना आणि कल्याणकारी मादगी समाज बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने मादगी समाज भवन, चंद्रपूर येथे समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष जयदेव त्रिशुलवार होते.
या बैठकीत मादगी समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात मादगी समाजाचा पारिवारिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेतील अडथळे दूर करणे, जातीचे व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यावरही विशेष भर देण्यात आला.
पूर्वी शासनाने मादगी समाजाला ‘ढोरफोडी’ म्हणून दिलेली जमीन पुन्हा समाजाला प्रदान करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत एकमुखाने करण्यात आली. अ.ब.क.ड. उपवर्गीकरणावरही विचारमंथन करण्यात आले. यासंबंधी लवकरच जिल्हाधिकारी, आमदार आणि खासदार यांना निवेदन देण्यात येणार असून, त्याची तारीख निश्चित झाल्यावर सर्व समाजबांधवांना व्हॉट्सॲपद्वारे माहिती देण्यात येईल.
या बैठकीला बाबुराव कंबलवार (प्रदेश सल्लागार), शंकर पेगड (विदर्भ अध्यक्ष), बाबा पारखी (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर), ईश्वर कनूरवार (जिल्हा उपाध्यक्ष), बुद्धेश्वर गोरडवार (जिल्हा सचिव), अनिल आर्किलवार (जिल्हा सहसचिव), महादेव कोकमवार (शहर प्रमुख चंद्रपूर), अनिल बद्दलवार (जिल्हा कोषाध्यक्ष), संतोष पोटे (ग्रामपंचायत सदस्य व युवा सामाजिक कार्यकर्ता, भोयेगाव), रामांना त्रांडा (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता), शंकर दासरी (सामाजिक कार्यकर्ता), घनश्याम लाटलवार (शाखा अध्यक्ष कोठारी), शंकर आईलवार (शाखा अध्यक्ष अहिरे), प्रभाकर चिलमे (शाखा सचिव अहिरी), विकास चिलमुलवार (शाखा सहसचिव आयरी), राकेश चिलमुलवार (सदस्य), रविंद्र येमुलवार (सदस्य उपरवाही), महादेव त्रिशुले (सदस्य, चंद्रपूर), विकी लिंगमपल्ली (युवा सामाजिक कार्यकर्ता, नकोडा), शंकर गुड डॅडी (सामाजिक कार्यकर्ता, नकोडा), वसंता मिस्त्री (सामाजिक कार्यकर्ता, नकोडा) आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सर्व समाजबांधवांनी एकजुटीने समाजहितासाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.