शिक्षक आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने ‘लालगुडा’शाळा झाली सुंदर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : शाळा हा समाजाचा आरसा असतो व समाजाचे स्वच्छ प्रतिबिंब दिसायचे असेल तर शाळा सुंदर पाहिजे. तसेच आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शाळेतील शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे. या उद्देशाने कोरपना तालुक्यातील लालगुडा गावातील ग्रामस्थांनी ऐन पेरणीच्या दिवसांमध्ये शेतमजुरी करून शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी तब्बल ४२५००/- रुपये लोकवर्गणी देऊन शाळेचे चित्र पालटून टाकले आहे. यामुळे शाळेला नाविन्यपूर्ण रूप प्राप्त झाले आहे. या गावातील जि. प .शाळेचे पालटलेले चित्र सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी ठरत आहे.
मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड हे गावात आणि शाळेत विविध उपक्रम राबवत असतात. आणि ते यशस्वी करण्यासाठी सर्व गावकरी एकत्र येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून गावातील पहिली ते चौथी पर्यंत च्या शाळेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेच्या निमित्ताने शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले. यामुळे शाळेच्या सर्व भिंती बोलक्या झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय समजून सांगण्यास सोपे झाले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेच्या द्वारे गावामध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये पुढे असलेले गावकरी यांनी पुढे येत गावची शाळा टिकली पाहिजे यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेला मदत करण्याच्या हेतूने लोकसभागातून निधी गोळा केला आणि शाळेचे सुशोभीकरण केले. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी या शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. शालेय भिंती बोलक्या असल्याने विद्यार्थी सुद्धा भिंतीशी बोलू लागले आहेत.
शालेय इमारतीच्या भिंतीवर आतून व बाहेरून सुंदर व सुरेख चित्रे रेखाटले आहेत. त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष शालेय इमारत वेधून घेते यात शंका नाही.
अशा उपक्रमशील आणि आनंददायी शाळेमध्ये आपला पाल्य शिकत असल्याने पालक वर्गामध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे



