Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवसाहित्यिकांना उर्जा देणारे झाडीबोली साहित्य मंडळ : एक लेखाजोखा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

   कोणतेही मंडळ स्थापन करतांनी त्या मंडळाचे काही ना काही उद्दीष्ट ठरले असते.ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काही चांगल्या विचारांचे लोक जवळ येतात. बहुतेक मंडळे अश्याच उद्देशाने स्थापन केल्या जातात.यामध्ये काही आरोग्याच्या,काही शैक्षणिक, काही कला जोपासली जावी म्हणून. तर कोणी पारंपारिक सण, यात्रा उत्सव जोपासली जावी म्हणून मंडळे स्थापन करतात. काही मंडळे गरीब गरजू लोकांना मदत व्हावी म्हणून स्थापन करतात. अशी कितीतरी संस्था, मंडळे, हौशे,गवसेंकडून स्थापित केली जातात. आणि असेच चित्र बहुतेक सर्वत्र दिसून येते.

       परंतु आपल्या भागात साहित्यिक मंडळी निर्माण व्हावेत आणि यासाठी एखादे मंडळ स्थापन करावे, असा विचार करणारी मंडळी फार अत्यल्प आहेत. या गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आदिवासी जिल्ह्यात असा विचार करणारी मंडळी असतील असे कुणाला स्वप्नात सुध्दा वाटले नसेल. कारण या जिल्ह्यात साहित्यिक मुळात बोटावर मोजण्याइतके होते/ आजही आहेत. मात्र यातील बहुतांश साहित्यिक मंडळी हे स्वत:च्या विश्वात जगणारे/रमणारेच होते तसेच स्वतःचीच जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी होईल.याकडे त्यांचे लक्ष असते. किंबहुना साहित्यिक मंडळीत हीच प्रवृत्ती शिरलेली असते. स्वत:चे साहित्य जगापुढे मांडतील पण आपला वारसा चालवणारे कुणी निर्माण करावे असा विचार अजिबात त्यांच्या डोक्यात शिवत नाही.याला काही अपवाद असू शकतात.अशां अपवादी साहित्यिक मंडळींचे माझ्याकडून स्वागत आहे.

       मला सांगावयास आनंद वाटतो कि,अशा अपवादापैकीच गडचिरोलीतील काही कवींना या जिल्ह्यात साहित्यिक निर्माण व्हावे,एखादे कवींचे व्यासपीठ तयार व्हावे असे वाटताच ही साहित्यिक मंडळी एकत्र येऊन २२ जून २०१७ ला एक झाडी बोली साहित्य मंडळ स्थापन केले. या मंडळास आज सात वर्ष पूर्ण होत आहेत.मंडळ दहा बारा जनांचे छोटेसे.कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. तरीही हे मंडळ स्वबळावर आपले कार्य नेटाने करीत आहे.

     या मंडळाने आपल्या जिल्ह्यात नवीन कवी निर्माण व्हावेत यासाठी झाडीबोली गडचिरोली व्हाट्स अॅप ग्रुप तयार केलेला आहे. त्या माध्यमातून कवींनी लिहलेल्या त्यांच्या कवितेवर चर्चा होऊन त्यांना प्रस्थापीत कवींकडून मार्गदर्शन केल्या जाते.या ग्रुपवर नवकवींच्या प्रतीभेला चालना मिळण्यासाठी आॅनलाईन कविता/चारोळी स्पर्धा नेहमी घेतल्या जातात.आजमितीस अशा २२ स्पर्धा घेण्यात आल्या. या माध्यमातून मंडळाने जिल्ह्यातील कोरचीपासून सिरोंचापर्यंतचे जवळ जवळ ८०पेक्षा जास्त कवी शोधून काढले आहेत.

     या मंडळाने आतापर्यंत सहा विदर्भस्तरीय कवीसंम्मेलन दरवर्षी घेऊन गडचिरोली जिल्हा साहित्य क्षेत्रात कुठेही मागे नसल्याचे दाखवून दिले.या मंडळाने जिल्ह्यात झाडीबोली साहित्य मंडळाच्या सहा उपशाखा स्थापन करून ग्रामीण भागात साहित्य चळवळीचे बीजं पेरली आहेत.

     विशेष म्हणजे केंद्रीय झाडी बोली साहित्य मंडळ साकोलीचे आवाहन स्विकारून या मंडळाने मौशिखांब सारख्या ऐतिहासिक गावी दोन दिवसीय २७ वे झाडीबोली साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात साजरे करून दाखविले.या संमेलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली.एवढे हे संमेलन देखणे, संस्मरणीय झाले.यासाठी मौशिखांब वाशियांचे आभार मानावे‌ तेवढे कमीच आहेत.हे मंडळ छोट्याशा स्वरूपात कविता मैफिल दरमहा एकदा कुठेतरी घेत असते. यातून साहित्यिक विचारांची आदान प्रदान होते.

  झाडीबोलीचे संवर्धन व्हावे म्हणून या मंडळाने दरवर्षी झाडीपट्टीतील एका उत्कृष्ट कलावंताचा तसेच तीन नवनिर्मित उत्कृष्ट साहित्य कलाकृतींना रोख रक्कम,शाल श्रीफळ देऊन सत्कार करत असते. आजमितीस अशा १२ व्यक्तींचा सत्कार झालेला आहे.या वर्षी सुध्दा या प्रतिष्ठीत बक्षीसाचे वितरण वर्धापन दिनी बळीराजा पॅलेस येथील हाॅलमध्ये होत आहे.तसेच या झाडीपट्टीतील हात लिहते व्हावेत म्हणून वर्षातून कवितेच्या किमान चार आँनलाईन स्पर्धा घेऊन विजेत्यांचा समारंभ घेऊन सत्कार करते.या मंडळाने हरिश्चंद्राची फॅक्टरी ,मायेची पदर, गाव रामायण,झाडीचा गोंदा, अंतर मंतर, पानतोडणीच्या मोसमात,गोष्टी रान पाखरांच्या इत्यादी पुस्तकावर समीक्षात्मक चर्चासत्र घडवून आणले. सावलीला क्षणभर,गावरामायण,झाडीचा गोंदा,चंद्राची चक्कलस,आमची माणसं,आमचे शब्द,आनंदी,स्वानंदगीत,गोष्टी रान पाखरांच्या ,पानातोडणीच्या मोसमात इत्यादी पुस्तकाचे प्रकाशनाचे उत्तम समारंभ घेतले.

विशेष म्हणजे थोर संशोधक बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा अमृतमहोत्सवी वर्ष या मंडळाने ११ नोव्हेंबर २०१९ ला त्यांचे सोबत विविध कार्यक्रम शिवाजी महाविद्यालय गडचिरोली आणि आदिवासी आश्रमशाळा गिरोला येथे साहित्यिक चर्चासत्र घेऊन दिवसभर साजरा करण्यात आला.तसेच बालकवी निर्माण व्हावेत म्हणून कारवाफा जि. प. उ.प्रा.शाळेत दोनदा कविसंमेलन घेण्यात आले.काॅलेजच्या विद्यार्थ्यांना कवितेची आवड निर्माण व्हावी म्हणून गडचिरोलीतील एन.सी.सी. शिबीर, शासकीय आय. टी. आय. काॅलेज, महिला महाविद्यालय इत्यादी ठिकाणी कविसंमेलन घेण्यात आले.

  आज गझलेवर प्रेम करणाऱ्यांची रेलचेल आहे. या साहित्य प्रकारात गडचिरोलीतील कवीवर्ग मागे पडू नये म्हणून नुकतेच शिवाजी शाळेत मंडळाने गझल कार्यशाळा हा अनोखा उपक्रम राबविला.

  विस्तार भयास्तव सर्व कार्यक्रम इथे लिहणे शक्य नाही. काही मंडळे निव्वळ प्रसिध्दीसाठी काम करीत असतात.मात्र हे मंडळ निव्वळ पोकळ कविता निर्मितीचे नसून सामाजिक दायित्वाचे भान ठेवणारी पण आहे. म्हणून कोरोनासारख्या संकटात खारीचा वाटा म्हणून २१ हजार रूपये रक्कमेची मदत महाराष्ट्र सरकारला जिल्हाध्यक्षा मार्फत प्रदान करू शकली.

    हे मंडळ या भागात बोली जाणारी भाषा ज्याला आपण झाडी बोली म्हणतो तिचे संवर्धन व्हावे. या बोलीतील शब्द प्रमाण मराठीत रूढ व्हावे. साहित्य क्षेत्रात झाडी बोलीत साहित्य निर्माण व्हावे यासाठी सदोदित प्रयत्नरत असते.हे या मंडळाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, प्रा. विनायक धानोरकर, डॉ. प्रवीण किलनाके,कमलेश झाडे, मिलिंद उमरे, संजीव बोरकर,मारोती आरेवार,जितेंद्र रायपुरे,गजानन गेडाम,मालती सेमले,प्रेमिला अलोने,वर्षा पडघम,प्रतिक्षा कोडापे इत्यादी कवी हे या मंडळाचे प्रमुख शिलेदार आहेत.

      मंडळाचे पुढील उद्दीष्ट आहे पुस्तके प्रकाशित करणे, झाडी बोली कविता विद्यार्थ्यापर्यंत पोहचविणे.विद्यापिठात झाडी बोलीतील कविता,पुस्तके समाविष्ट करणे. जास्तीत जास्त शाखा उघडून त्याद्वारे साहित्यिक उपक्रम राबवीणे व अगोदरच्या उपक्रमात वाढ करणे असे आहे.

     आज गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळ हे विदर्भवासियांना अल्पावधीत परिचीत झालेले आहे. हे जिल्ह्यातील झाडी बोलीवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळेच होय हे नाकारता येत नाही.

     आज २२ जुन २०२३ ला या मंडळास सात वर्ष पूर्ण झाले.यानिमीत्त या मंडळाचा वर्धापनदिन बळीराजा पॅलेस गडचिरोली येथे साजरा करीत आहे.

      झाडीबोली साहित्य मंडळाकडून पुढेही असेच लोकोपयोगी चांगले कार्य घडो आणि मंडळ भरभराटीस येवो, या सदिच्छासह. जय झाडी

डॉ.चंद्रकांत लेनगुरे, संमेलनाध्यक्ष

३१ वे झाडीबोली साहित्य संमेलन बामनी खडकी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये