Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी रुग्णालयातील नव्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे लोकार्पण

ग्रामीण भागात अद्यावत आरोग्यसेवेची संधी - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा – सावंगीसारख्या एका खेडेवजा गावात आरोग्याच्या सर्व अद्यावत सेवा उपलब्ध असणे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. केवळ महानगरात असणारी टेस्ट ट्यूब प्रक्रिया येथे होते आहे. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ देणारे हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील नवनिर्मित टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी काढले.

मेघे समूहाच्या विश्वस्त शालिनीताई मेघे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या लोकार्पण समारोहाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे होते. यावेळी, प्रकुलगुरू डॉ. गौरवकुमार मिश्रा, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, आयव्हीएफ केंद्र संचालक डाॅ. दीप्ती श्रीवास्तव, अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, कार्यकारी संचालक डॉ. तृप्ती वाघमारे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. नीमा आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ३२५व्या टेस्ट ट्यूब बाळाचा व मातेचा अतिथींच्या हस्ते बेबी किट भेट देऊन सन्मान करण्यात आला.

सावंगी मेघे रुग्णालयात अत्याधुनिक साधनांमुळे आयव्हीएफ म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेच्या यशस्वितेचे प्रमाण समाधानकारक आहे. मागील आठ वर्षात या रुग्णालयात  ३२५ टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आले असून या बाळांना जन्म देणाऱ्या माता ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील आहेत. अनेक जोडपी वैवाहिक जीवनाच्या साधारणतः १३ ते १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अपत्यसुखाचा आनंद घेत आहेत, असे डाॅ. दीप्ती श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. शीतल थूल, डॉ. जारुल श्रीवास्तव, डॉ. आकाश मोरे, नम्रता अंजनकर, लाखी बिश्वास, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, सुरेंद्र यादव, रंजना दिवे, मिलिंद आगलावे यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये