Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे

देऊळगाव राजा येथे सापडलेले पैशाचे पाकीट अजिमखान यांनी देशपांडे यांना केले परत !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 आजच्या कलियुगात पैसा पाहिला की चांगल्या चांगल्यांची नियत फिरते. “आपला पैसा तो आपला, आणि दुसऱ्याचा पैसाही आपलाच” असे धोरण बऱ्याच जणांचे असते. परंतु या कलियुगात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय काही घटनांवरुन दिसून येतो. प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याची अशीच एक घटना देऊळगावराजा येथे १ जूनच्या रात्री घडली. या घटनेत रात्रीच्या वेळेस सामसूम रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट ‘त्या’ व्यक्तीने पोलिसांच्या साक्षीने समोरील व्यक्तीस परत केले. विशेष म्हणजे पाकीट हरवलेली व्यक्ती ब्राम्हण समाजाची तर पाकीट परत करणारी व्यक्ती मुस्लिम समाजाची होती. त्यामुळे या घटनेतून प्रामाणिकपणाचे दर्शन घडत असतांनाच हिंदू-मुस्लिम, भाई-भाई हा संदेशही सर्वदूर गेला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळेस बरेचजण मोकळ्या व थंड हवेत बाहेर फिरायला जातात. त्यानंतर थंड पदार्थ किंवा शीतपेयांचा आस्वाद घेऊन घरी परततात. देऊळगावराजा येथील रहिवासी अजिमखान हकीमखान हेही १ जूनच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास स्थानिक बसस्थानक चौकातून आईस्क्रिमचा आस्वाद घेऊन घरी परतत होते. दरम्यान स्थानिक संतोष चित्र मंदीर चौकातील मदिना कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्याच्या कडेला त्यांना एक पाकीट दिसले. पाकीट उचलून घेतल्यानंतर त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना आधारकार्ड व पाच ए.टी.एम. कार्ड आढळून आले. तसेच नगदी १८०० रुपये व घडी करून ठेवलेली कागदपत्रे दिसली. त्यांनी आजूबाजूला पाहिले, परंतु त्या ठिकाणी कोणीही दिसले नाही.

अजिमखान यांनी दुसऱ्या दिवशी (२ जून) सकाळीच पोलिस स्टेशन गाठले. या पाकिटाबद्दल ठाणेदार संतोष महल्ले यांना कल्पना देऊन त्यांनी ते पाकीट ठाणेदारांच्या सुपुर्द केले. ठाणेदारांनी ते पाकीट उघडून पाहिले. त्यामधील आधारकार्ड पाहिले असता त्यावर श्रीकांत श्रीकृष्ण देशपांडे असे नाव व मारोती मंदीरासमोर, गारखेडा परिसर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) असा पत्ता होता. पाकीटामधील इतर चिठ्ठ्या तपासल्यानंतर एका बिलावर देशपांडे यांचा मोबाईल क्रमांक आढळला.

ठाणेदार महल्ले यांनी त्या क्रमांकावर कॉल करून पाकीट हरवल्याची व समोरील व्यक्ती देशपांडेच बोलत असल्याची खात्री करुन घेतली. खात्री पटल्यानंतर ठाणेदार महल्ले यांनी ते पाकीट त्यातील रोख रक्कम व कागदपत्रांसह अजिमखान यांच्या हस्ते श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सर्वांनीच अजिमखान यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

यावेळी ठाणेदार संतोष महल्ले, नासेरभाई (जनतासेवा), पोलिस कर्मचारी यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये