Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“शिवराज्याभिषेकामुळे इतिहासाचा प्रवाह बदलला” – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांनी व्यक्त केले मत

शिवराज्याभिषेक ग्रंथ 'शिवजागर' विचारमंथन सोहळा पार पडला

चांदा ब्लास्ट

इको-प्रो, सरदार पटेल महाविद्यालय, कृष्णा प्रकाशन व सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे आयोजन

चंद्रपूर : “शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील राज्याभिषेकाची घटना ही इतिहासाचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराजांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे मुघलांच्या सत्तेला भिडण्याचे आणि दिल्लीचे तख्त राखण्याचे असामान्य शौर्य व धैर्य मराठे दाखवू शकले याची प्रेरणाबीजे राज्याभिषेकाच्या घटनेत आहेत. राज्याभिषेकाने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक क्षेत्रांतही उत्क्रांती घडली” असे मत सरदार पटेल महाविद्यालय येथे आयोजित ‘शिवजागर’ या कार्यक्रमात चेतन कोळी यांनी व्यक्त केले. इको-प्रो संस्था, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “शिवजागर” या उपक्रमात ते बोलत होते.

शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त अनिल पवार यांच्या संकल्पनेतून व डॉ सदानंद मोरे यांच्या संपादनातून सिध्द झालेल्या “शिवराज्याभिषेक – भारताच्या इतिहासातील असामान्य घटना” या ग्रंथाच्या औचित्याने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरदार पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर मंचावर अनिल पवार, बंडू धोतरे, अभय बडकेलवार, किशोर जामदार यांची उवस्थिती होती.

चेतन कोळी पुढे म्हणाले, “राज्याभिषेकामुळे शिवरायांना थेट सार्वभौम राजाचा दर्जा मिळाला. आपले राज्य कोणाचे मांडलिक नसून ते स्वतंत्र, सार्वभौम आहे आणि आपण त्याचे सार्वभौम राजे आहोत, हा संदेश शिवरायांना तत्कालीन मुघली सत्तांना आणि स्वराज्यातील इतर मराठा सरदारांना द्यायचा होता. राज्याभिषेक विधीमुळे ही अधिकृत राजमान्यता प्राप्त झाली आणि रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने स्थापित झाले. या घटनेमुळे पुढे मराठ्यांना परकीय आक्रमणाविरुध्द लढण्याची प्रेरणा लाभली. सभासद म्हणतात त्यानुसार ही निसंशय एक असामान्य घटना होती. या घटनेमुळे इतिहासाचा प्रवाहच बदलला. महाराज केवळ अर्थव्यवस्था चालवत नसत. तर या राज्याच्या भाषेकडेही त्यांचे लक्ष असे. म्हणूनच राज्याभिषेकानंतर यातल्या राज्य व्यवहार कोषाची जबाबदारी रघुनाथ पंत हनुमंते यांच्यावर महाराजांनी सोपवली होती, पण पंत त्यांच्या कामात इतके व्यस्त होते की, त्यांनी ही जबाबदारी चिंचवडच्या धुंडीराज व्यासांवर सोपवली. व्यासांनी या कोशात महाराजांसाठी एक सुंदर शब्द वापरला आहे – ‘शिवसार्वभौम’ याचा अर्थ शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्वतंत्र सार्वभौम होतं. महाराजांनी पत्र लेखन पद्धतीतही बदल केला. व्यवहारात फारशी शब्द खूपच होते त्यावेळी. महाराजांनी जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर सुरू केला करण कौस्तुभ, राज्यव्यवहार कोष, लेखन प्रशस्ती यांसारखे ग्रंथही निर्माण केले. महाराजांच्या चरित्रातून आणि राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा घेत आपण आजच्या काळातील दडपशाही व एकाधिकारशाही यांच्याविरूद्ध लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 या ग्रंथाचे संकलक व प्रकाशक अनिल पवार यांनी या ग्रंथाच्या निर्मितीचा प्रवास मांडताना सांगितले, “‘6 जून – शिवराज्याभिषेक दिन’ महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामपंचायतीत साजरा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अर्ज, विनंत्या आणि संबंधित खात्यातील मंत्री-अधिकारी वर्गासोबत झालेल्या चर्चांच्या असंख्य फेर्‍यांनंतर मी लावून धरलेली मागणी शासनाने अखेर मान्य केली. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत प्रेरणादायी आणि आजवरचे प्रयत्न सार्थकी लावणारा क्षण होता. भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून 6 जून हा दिवस ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार असल्याचे शासनाने 1 जानेवारी, 2021 रोजी जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याच्या निर्णयानुसार, 6 जून 2021 रोजी महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांमध्ये ‘शिवस्वराज्यदिन’ साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते. 351 पंचायत समित्यांच्या मुख्य भवनासमोर तालुक्याचे आमदार, सभापती, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायती आणि 43,000 गावांमध्येदेखील त्या त्या गावच्या सरपंच व सदस्यांसह ग्रामस्थांनी हा सोहळा तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला होता.शिवरायांचा राज्याभिषेक हा तत्कालीन मुगलशाही, आदिलशाही किंवा कुतुबशाही अशा कोणत्याही सत्तेचे मांडलिकत्व न पत्करता, शेकडो वर्षांची जुलमी राजवट झुगारून देणारा सार्वभौम व निर्भेळ स्वातंत्र्याचा बुलंद उद्घोष होता म्हणूनच भारताच्या इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांत लिहून ठेवलेली आहे. आज 350 वर्षांनंतर शिवस्वराज्य दिन महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात साजरा होत असलेला पाहताना मी अक्षरशः कृतकृत्य होत होतो. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि महाराष्ट्रदिनाला आपण जसा उत्सव साजरा करतो, अगदी तसाच उत्सव साजरा करण्याची आणि शिवविचारांचा जागर मांडण्याची संधी ‘शिवस्वराज्यदिना’मुळे सबंध महाराष्ट्राला लाभली आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या मनात अभूतपूर्व उत्साह संचारला; पण या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी आणखी काय करता येईल, यावर माझी विचारचक्रे सुरू झाली. हा दिवस केवळ उत्सवी रूपात आणि वार्षिक कर्मकांडाप्रमाणे साजरा न होता त्याला भक्कम वैचारिक अधिष्ठान असावे, असे मला वाटत होते. त्यातूनच ‘शिवराज्याभिषेक – भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या पुस्तकाचा जन्म झाला.”

 बंडू धोतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ स्वप्नील माधमशेटीटीवार यांनी शिवजागर या उपक्रमाची प्रशंसा करत, प्रत्येक विद्यापीठात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करून नव्या पिढीचे प्रबोधन केले पाहिजे, शिवराज्याभिषेकाची असामान्य घटनामागे विविध प्रेरणा आणि विविध इतिहास अभ्यासकांच्या लेखाचे संकलन आजच्या पिढी पर्यंत पोहचले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम दरम्यान उपस्थित तानाजी मालूसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील मेश्राम तर आभार रोहिणी चिकनकर हिने व्यक्त केले. या कार्यक्रमास इको-प्रो चे सदस्यासह मंदार मते, राजेश पिंजरकर, बंडू काकडे, नभा-संदीप वाघमारे, दीपक तुराणकर, नितेश येगीनवार, नितीन रामटेके, विजय हेडाऊ, अब्दुल जावेद, अभय अमृतकर, सुमित कोहळे, सौरभ शेटे, सुनील लिपटे, योजना धोतरे, मनीषा कोहपरे, विशाखा लिपटे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये