ताज्या घडामोडी

प्रेमविवाहाला नकार दिल्याने लागला वाघाच्या शिकारीचा छडा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

एका पित्याने आपल्या मुलीच्या प्रेमविवाहाला नकार देत प्रियकर व त्याच्या पित्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्याने नाट्यमयरित्या वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असुन वन विभागाने मुलीच्या वडिलांविरुद्ध वाघाच्या शिकारीचा गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुल तालुक्यांतील उधळपेठ (मणिपुर) येथील एका मुलाचे त्याच गावातील एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या व भावी आयुष्य एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकुन घालविण्याचे ठरविले. मुलाच्या इच्छेनुसार पित्याने सदर मुलीच्या वडिलांकडे रीतसर लग्नाची मागणी घातली मात्र त्यांचा ह्या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी लग्नाला नकार दिला.

एवढ्यावरच मुलीचे वडील थांबले असते तर त्यांचेच बिंग फुटले नसते कारण त्यांनी मुलीला प्रेमाच्या पाशात अडकविणाऱ्या मुलाची व त्याच्या वडिलांची मुल पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी त्या पिता पुत्राला अटक करून मुल पोलीस ठाण्यात आणले असता लग्नाला नकार तर दिलाच पण पोलिसात तक्रार करून आपल्याला अटक करविल्याच्या रागात मुलाच्या वडिलांनी पोलिसांना 2023 मधे झालेल्या वाघाच्या शिकारीचे रहस्य सांगुन टाकले.

शिकारीची माहिती मिळताच पोलिसांनी वन विभागाला माहिती दिली. ही माहिती ऐकुन हादरलेल्या वनाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून अधिक चौकशी केली असता 2023 मधे त्या मुलीच्या वडिलांनी वाघाची शिकार करून कातडे काढून उर्वरित मांस जाळुन टाकले असुन वाघाची हाडे जमिनीत पुरून ठेवल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली व जमीन खोदून बघितली असता वाघाची हाडे आढळून आल्याने त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये