कसोशीने प्रयत्न केले तर यश नक्कीच पदरात पडते – आयएएस शारदा माद्देशवार
मॅकरून स्टुडंट अकॅडमी स्कूलतर्फे सत्कार
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : कोणतेही प्रयत्न हे वाया जात नाहीत. यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रयत्नात शिक्षकांचेही तेवढेच योगदान मिळायला हवे. विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करत राहावे, यश नक्कीच आपल्या पदरी पडते, असा सल्ला राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चंद्रपुरातील शारदा विजया गजानन माद्येशवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शारदा माद्येशवार हिने वडगाव येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मॅकरून स्टुडंट अकॅडमी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेच्या विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशाबद्दल सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत मांडले. शारदाने बालपणापासून आयआरएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. नियमित अभ्यास करून आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन तिने घेतले.
सलग चार वर्षे अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही सिव्हिल सर्व्हिसेस होण्याचे प्रयत्न तिने सोडले नाही. अपयशानंतरच यश मिळते या म्हणीप्रमाणे पहिले तिचे प्रयत्न फळास आले. आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यासोबतच तिने शाळेचेही नाव मोठे केले आहे, अशा शब्दात पी. एस. आंबटकर यांनी तिचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पीयूष आंबटकर, अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, प्रा. दीपक मस्के, प्राचार्य राजकुमार तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.