ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकार्यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

शाळा – महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पिपरे, डॉ. श्वेता सावलीकर, डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (माध्य) निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळा – महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत, याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयामध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही :

सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) कलम – ४ अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये ५६६ नागरिकांकडून ५५३७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागाच्या वतीने गत वर्षी २०७६ प्रकरणांमध्ये ४ लक्ष १५ हजार २०० दंड ठोठावण्यात आला. तर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नियम व नियमन २०११ प्रतिबंध अन्नपदार्थ कार्यवाही अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतमध्ये १५ प्रकरणात १३३२९ किलो (एकूण किंमत १ कोटी ४४ लक्ष ८० हजार २२७ रुपये) साठा जप्त करण्यात आला.

यावेळी मागील सभेचे इतिवृत्त, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणा-या कार्याचा अहवाल सादर करणे, ३१ मे रोजी जागतिक तंबाखु नकार दिन साजरा करणे, जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम ४, कलम ५, कलम ६ (अ) आणि (ब) प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करणे, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्ह्यातील शाळा तंबाखु मुक्त करणे, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये