इको प्रो संस्थेत पडणार फुट – अनेक जेष्ठ सदस्य राजीनाम्याच्या तयारीत
बंडू धोत्रे ह्यांची राजकीय कोलांटउडी ठरणार संस्थेच्या फुटीचे कारण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यावरणवादी व सामाजिक संघटना म्हणून सर्वपरिचित असलेली इको प्रो संस्था फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडु धोत्रे ह्यांची राजकीय कोलांटउडी संस्थेच्या फुटीचे कारण ठरली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे.
प्राप्त माहितीनुसार इको प्रो ही संस्था बंडु धोत्रे ह्यांचे अध्यक्षतेखाली उत्कृष्ठ कार्य करीत होती. जिल्ह्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण तसेच स्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण, वन्य जीवांचे संवर्धन इत्यादी अनेक क्षेत्रात ही संस्था अग्रगण्य आहे. ह्या संस्थेची स्थापना करतेवेळी संस्था पुर्णपणे अराजकीय ठेवण्याची ग्वाही संस्थापक बंडु धोत्रे ह्यांनी दिली होती. नजीकच्या काळापर्यंत संस्थेत कोणत्याही प्रकारचे राजकीय उपक्रम अथवा बांधिलकी नव्हती. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ही संस्था प्रामाणिकपणे कार्य करीत होती. इतकेच नव्हे तर संस्थेच्या खर्चासाठी लागणारा निधी देखिल राजकीय पक्षांच्या देणगीतून जमाविण्यात येत नव्हता त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य देखिल कोणत्याही राजकीय पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नसावे अशी अट घालण्यात आली होती.
संस्थेच्या कामकाजाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखिल आपल्या मन की बात ह्या कार्यक्रमात संस्थेच्या कार्याची दखल घेतली होती तसेच संस्थेला अनेक पुरस्कार देखिल प्राप्त झाले होते. मात्र अशातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अध्यक्ष बंडु धोत्रे ह्यांनी संस्थेच्या सदस्यांना विश्वासात न घेता काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्यांना संस्थेच्या वतीने एकतर्फी पाठिंबा जाहीर केला.
बंडु धोत्रे ह्यांनी अचानकपणे व एकतर्फी घेतलेल्या ह्या राजकीय कोलांटउडीमुळे संस्थेचे जुने जाणते कार्यकर्ते संभ्रमात पडले असुन संस्थेच्या मुळ ध्येय धोरणाला एकतर्फी फाटा देऊन राजकीय पक्षाच्या दावणीला संस्था बांधण्याच्या कृतीचा विरोध करण्यासाठी काही जेष्ठ सदस्य राजीनाम्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती चांदा ब्लास्ट ला मिळाली आहे. सुरुवातीला संस्थेचे मोजके पण 15 वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेले काही सदस्य राजीनामा देणार असुन पुढील काळात बरेच सदस्य संस्थेपासून फारकत घेणार असल्याचा त्यांचा दावा आहे हे विशेष.
मी प्रतिभा धानोरकर ह्यांना इको प्रो संस्थेच्या वतीने समर्थन दिले नसुन मी स्वतः वैयक्तिकरीत्या काँग्रेस पक्षात सामील होऊन पक्षाचा कार्यकर्ता होण्याची इच्छा त्या पत्राद्वारे काँग्रेस जिल्हाध्यक्षांना दिलेल्या पत्रातून व्यक्त केली होती. संस्थेच्या पाठिंब्याबाबत गैरसमज निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.
बंडु धोत्रे
अध्यक्ष, इको प्रो