ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा नवा संदेश समाजात पोहोचेल _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुल येथे भव्य आरोग्य शिबिर

चांदा ब्लास्ट

“स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ

मुल येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न

चंद्रपूर : देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मुल येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असून, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा एक नवा संदेश समाजात पोहोचेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे, चंदू मारगोनवार,प्रवीण मोहूर्ले, नंदू रणदिवे, रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर, तहसीलदार मृदुला मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे, गटविकास अधिकारी अनिल चणफणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर सोनारकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बावणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लांडे आदींची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतही ज्या सेवा उपलब्ध नाहीत, त्या सेवा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे. जिल्ह्यात अत्याधुनिक मेडिकल कॉलेज, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मुलमध्ये 100 बेडेड हॉस्पिटल, तसेच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, कृषी महाविद्यालय असे अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक उपजिल्हा रुग्णालये जमिनीअभावी रखडली असताना, महाराष्ट्रातील हे पहिले उपजिल्हा रुग्णालय आहे जे जमीन खरेदी करून उभारण्यात येत आहे. साधारणपणे उपजिल्हा रुग्णालयासाठी 8 हजार चौ.मी. बांधकामाला परवानगी असते; मात्र हा महाराष्ट्राचा पहिला प्रयोग असून, यात तब्बल 15 हजार चौ.मी. मध्ये महाराष्ट्रातील पहिला अत्याधुनिक रुग्णालय उभारले जात आहे. बदलती जीवनशैली, अति खतांचा वापर आणि रासायनिक फवारणी यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. परिणामी किडनीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. या रुग्णांना चंद्रपूर-नागपूर येथे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी येत्या महिनाभरात मुल येथे ‘5 बेडचे डायलिसिस सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 राज्याच्या प्रगतीत चंद्रपूर जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे. माझ्यासाठी निवडणूक जिंकण्यापेक्षा सामान्य जनतेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळणारा आशीर्वाद अधिक मूल्यवान आहे. केंद्रीय मंत्री,विकासपुरूष नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चंद्रपूर–मुल मार्गावर खड्डे पडू नयेत यासाठी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुल येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात येणाऱ्या ओव्हरब्रिजला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी मान्यता दिली असून, पुढील दोन वर्षांत हा ओव्हरब्रिज पूर्णत्वास जाईल, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, जनतेची सेवा हेच खरं समाजकारण आणि राजकारण आहे. जिल्ह्यात अत्याधुनिक मेडिकल कॉलेज उभारण्यात आले असून, कोविड काळात 500 पीपीई किट्स, सॅनिटायझर मशीन तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘पिंक ओपीडी’ सुरू करण्याचा मानस असून, या माध्यमातून गर्भवती भगिनींची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आणि सहकार्याची भावना आहे. सामान्य जनतेची सेवा करण्याची त्यांच्यामध्ये उपजत इच्छा आहे. ही सेवा त्यांनी केवळ नोकरी म्हणून नव्हे, तर जनतेची सेवा करण्याचे पुण्यकार्य म्हणून सातत्याने करत राहावी, अशी अपेक्षा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या आरोग्य शिबिरात साधारणपणे 3 ते 4 हजार भगिनींचे आरोग्याचे निदान करणार आहे. याशिवाय महिलांसाठी मोफत तपासणी, उपचार, पोषण आहार मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध सोयी सुविधांची तसेच आरोग्य शिबिराच्या व्यवस्थेची पाहणी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये