ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर!

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

चांदा ब्लास्ट

अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत सुविधांना मिळेल चालना

बल्लारपूर :_ राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघासाठी एकूण ७५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून दुर्गापूर, उर्जानगर आणि बल्लारपूर नगरपरिषद हद्दीतील अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये विविध धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण भिंती, पेव्हर्स ब्लॉक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बल्लारपूर मतदारसंघातील विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ येथील हक्की मस्जीद परिसरात संरक्षण भिंत बांधकामासाठी १० लक्ष रुपये, दुर्गापूर वॉर्ड क्रमांक १ येथील सेंट मायकल चर्च परिसरात संरक्षण भिंत व पेव्हर्स ब्लॉकसाठी १० लक्ष रुपये तसेच उर्जानगर येथील गुरुद्वारा श्री हर गोविंद साहेब परिसरात पेव्हर्स ब्लॉकसाठी १० लक्ष, उर्जानगर वॉर्ड क्रमांक ५ डब्ल्यूसीएल कॉलनी येथील मस्जीद परिसरात पेव्हर्स ब्लॉकसाठी १० लक्ष रुपये, दुर्गापूर येथील सेंट मेरीस चर्च परिसरात पेव्हर्स ब्लॉकसाठी १० लक्ष, बल्लारपूर येथील ख्रिश्चन कमिटी कब्रस्तानात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी १० लक्ष रुपये , त्याच कब्रस्तानात विसावा शेड बांधकामासाठी १० लक्ष आणि बल्लारपूर येथील जीवनज्योती चर्च परिसरात सौंदर्यीकरण व अनुषंगिक कामांसाठी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाने अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन २००८-०९ पासून ही योजना राबवली असून २०१५-१६ पासून सुधारित कार्यपद्धतीनुसार योजना सुरू आहे. याच योजनेअंतर्गत सन २०२५-२६ साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून बल्लारपूर मतदार संघासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 बल्लारपूर मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये नागरी सुविधा, सुरक्षितता आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार असून स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये