ताज्या घडामोडी

एकाच दिवसात १० लाखांची कर वसुली करून राजुरा नगर पालिकेने केला रेकॉर्ड ब्रेक

थकीत मालमत्ता कर धारकांवर उद्या पासून सुरू होणार जप्तीची कारवाई

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

राजुरा नगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणावर कर थकीत आहे. दरवर्षी थकीत कर वसुलीचा डोंगर वाढतच असल्याचा परिणाम नगर परिषदेला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर होतो. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कर वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण न झाल्यास शहराच्या विकासाकरिता शासनाकडून नगर पालिकेला मिळणारा निधी रोखुन धरल्या जातो परिणामी शहराच्या विकासकामात खंड पडतो त्याचप्रमाणे नागरिकांना सुविधा देण्यात अडचणी निर्माण होतात असे राजुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव ह्यांनी चांदा ब्लास्ट सोबत बोलताना सांगितले.

कर वसुलीसाठी नगरपरिषदेने कंबर कसली असून करवसुली मोहीम जोमात राबविली जात आहे. या कर वसुली करिता राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सूरज जाधव यांच्या संकल्पनेतून *Be the change you want to see अभियान २.०* अंतर्गत कर भरण्याची सुरुवात स्वतः पासून करण्याची मोहीम हाती घेऊन सर्व प्रथम नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून कर भरणा पूर्ण करुन घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आले असुन त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून शहरातील मालमत्ता धारक कर्मचाऱ्यांची यादी घेऊन त्या कर्मचाऱ्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी कर भरणा करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन पालिकेने सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना केले आहे.

नगरपरिषदेतर्फे कर वसुली मोहिमेची जोरदार अंमलबजावणी केली जात असून मालमत्ता धारकांच्या घरोघरी जाऊन कर वसूल केला जात आहे. दिनांक 13 मार्च रोजी एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक असा 10 लाख सहाशे त्र्याऐंशी रुपयांचा कर वसूल करण्यात आला ह्यासाठी मालमत्ता धारकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल पालिका प्रशासनाने सर्व करदात्यांचे अभिनंदन करण्यात आले असुन कर भरल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे. करवसुली मोहीम प्रभावीपणे राबविणाऱ्या कर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी डॉ सूरज जाधव, कर अधिकारी अक्षय सूर्यवंशी, जप्ती पथक प्रमुख संदीप वानखेडे(प्रशासकीय अधिकारी) ह्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नगर परिषदेद्वारे मालमत्ता धारकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक कर भरत नसल्याने मुख्याधिकारी डॉ सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनखाली 15 मार्च पासून थकीत मालमत्तांची व गाळ्यांची जप्ती तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांची नळ कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे . त्याकरिता नगर परिषद द्वारे थकीत मालमत्ता धारकांना व गाळे धारकांना महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायती अधिनियम 1965 च्या कलम 152 नुसार जप्ती अधिपत्र देखील तामील करण्यात येत आहेत.

तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी, रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी देखील नगर परिषद कार्यालयात कर भरणा सुरू राहील. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सूरज जाधव यांनी राजुरा शहरातील मालमत्ता धारकांना तात्काळ कर भरणा तसेच पाणीपट्टी व गाळे किराया भरणा करून जप्ती टाळावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये