ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसापूर (चंद्रपूर) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे भूमिपूजन

विद्यापीठाचे केंद्र चंद्रपुरात आले ही महिला व तरुणींसाठी आनंदाची बाब - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चांदा ब्लास्ट

चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे नव्याने सुरू होणारे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे केंद्र जिल्ह्यातील महिला व तरुणींसाठी आनंदाची बाब आहे. यामुळे महिला शिक्षणाला चालना मिळेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

चंद्रपूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, डॉ.जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. रूबी ओझा, डॉ विलास नांदवडेकर, संचालक डॉ. राजेश इंगोले आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे, येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील महिला व तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले सुधीरभाऊ सारखे लोकप्रतिनिधी लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायची, हे सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवून दिले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली आहे. आता विद्यापीठ आणून यामुळे शिक्षणाची संधी जिल्ह्यातील महिलान उपलब्ध करुन देत आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एस.एन.डी.टी. मुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी : सुधीर मुनगंटीवार

वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतर लोकार्पण सोबतच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन पार पडले. यामुळे जिल्ह्यातील महीलांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची मोठी संधी प्राप्त होणार आहे. यामुळे कौशल्य शिक्षण मिळेल असे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विद्यापीठाला ५९० कोटी मंजूर केले म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने आणि एसएनडीटी विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले तर आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मानले.

असे राहणार एसएनडीटी महिला विद्यापीठ,बल्लारपूर

ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे 50 एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे पाठबळ विद्यापीठाला लाभले. सोबतच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही या प्रकल्पास मोलाची मदत झाली असे कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव सांगतात. यासाठी 589 कोटी 93 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रस्तावित बांधकाम एकूण 87290 चौ. मीटरवर होणार असून यामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय कार्यालये, सेमिनार हॉल, वर्गखोली, व्याख्यान सभागृह, बोर्ड मिटींग रुम, फॅकल्टी रुम, 700 विद्यार्थीनींसाठी बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह दोन वसतीगृह इमारती, ग्रंथालय इमारत, डीजीटल लायब्ररी, 860 क्षमतेची सभागृह इमारत, कॅफेटेरीया, भोजनगृह इमारत, क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल व विविध पारंपरिक खेळांकरीता इनडोअर स्पोर्टस् बिल्डिंग, व्यायामशाळा, कराटे, बॉक्सिंग, कुस्तीसाठी विशेष हॉल, दर्शकांसाठी गॅलरी, अतिथीगृह इमारत, कर्मचारी निवास आदींची तरतूद आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये