ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1667 कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन ; पुढील तीन महिने बॉटनिकल गार्डन पर्यटनासाठी मोफत - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, डॉक्टर जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बोटॅनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे, येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहे, याचा आनंद आहे.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले सुधीरभाऊ सारखे लोकप्रतिनिधी लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायची, हे सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवून दिले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पर्यटनासाठी पुढील तीन महिने बॉटनिकल गार्डन मोफत : सुधीर मुनगंटीवार

वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले. पुढील तीन महिने पर्यटनासाठी बोटॅनिकल गार्डन मोफत असेल, अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

चंद्रपूर मध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून 20 कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोहोचला आहे. तसेच ॲडव्हाँटेज चंद्रपूर मध्ये विविध उद्योगांचे 75 हजार कोटींचे सामंजस्य करार येथे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चंद्रपूर मध्ये उद्योगांनी गुंतवणूक केली असून पुढील दहा वर्षात येथील बेरोजगारी संपुष्टात येईल.

आज चंद्रपूर मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 590 कोटी, बॉटनिकल गार्डनचा पहिला टप्पा 264 कोटी, महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना 270 कोटी आणि मलनि:स्सारण प्रकल्प 570 कोटी अशा एकूण 1667 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरात आज करण्यात आले. निवडणुकीनंतरही चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सैनिक स्कूल आदींचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा चंद्रपूरला यावे, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

असे राहील एस.एन.डी.टी विद्यापीठ : ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे 50 एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 589 कोटी 93 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रस्तावित बांधकाम एकूण 87290 चौ. मीटरवर होणार असून यामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय कार्यालये, सेमिनार हॉल, वर्गखोली, व्याख्यान सभागृह, बोर्ड मिटींग रुम, फॅकल्टी रुम, 700 विद्यार्थीनींसाठी बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह दोन वसतीगृह इमारती, ग्रंथालय इमारत, डीजीटल लायब्ररी, 860 क्षमतेची सभागृह इमारत, कॅफेटेरीया, भोजनगृह इमारत, क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल व विविध पारंपरिक खेळांकरीता इनडोअर स्पोर्टस् बिल्डिंग, व्यायामशाळा, कराटे, बॉक्सिंग, कुस्तीसाठी विशेष हॉल, दर्शकांसाठी गॅलरी, अतिथीगृह इमारत, कर्मचारी निवास आदींची तरतूद आहे.

बॉटनिकल गार्डन :

चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर विसापूर येथे श्रद्धेय श्री. अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डनची) 108 हेक्टर क्षेत्रात निर्मिती करण्यात आली आहे. बॉटनिकल गार्डन निर्मितीचे उद्देश : निसर्ग शिक्षण, मनोरंजन आणि निसर्ग पर्यटन यात वाढ करणे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. फुल व फळ या शास्त्रासोबत रोपवाटिका तंत्राचा व व्यवस्थापनाचा पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक विकास करणे. रोपे लागवड आणि नवीन प्रजातींची ओळख करून उद्यान विज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. तसेच वातावरण बदल व ग्लोबल वॉर्मिंग याबाबत जनजागृती घडून ग्रीन एनर्जीचा वापर करण्याकरिता प्रोत्साहन देणे.

चंद्रपूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व मननि:स्सारण प्रकल्प : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 270 कोटी 13 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा प्रकल्प व चंद्रपूर शहराकरिता प्रथम टप्प्यात 542 कोटी ५ लाख रुपयाचा मनानिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरातील एकूण 54 हजार घरगुती जोडणी करण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये